Kedarnath Helicopter Crash : केदारनाथवरून चार धाम यात्रेसाठी निघालेल्या काही यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या एका हेलिकॉप्टरचा रविवारी पहाटे रुद्रप्रयागच्या गौरीकुंडजवळ कोसळून अपघात झाला. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सांगण्यात आली. या मृतांमध्ये हेलिकॉप्टरच्या पायलटसह एका दोन वर्षांच्या मुलीचा देखील समावेश होता असी माहिती घटनेनंतर सांगण्यात आली आहे.
गौरीकुंडापासून जवळपास ५ किमी अंतरावर असलेल्या गौरी माई खार्क या ठिकाणी हे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली. या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालेल्या कॅप्टन राजवीर सिंग चौहान यांनी भारतीय लष्करात जवळपास १५ वर्ष सेवा बजावली होती. पण या अपघातात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. सर्वात हृदयद्रावक म्हणजे ४ महिन्यांपूर्वी त्यांना दोन जुळे मुलं झाले होते. हे मुलं आता पोरकी झाले आहेत.
राजस्थानचे कॅबिनेट मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी शोक व्यक्त करताना म्हटलं की, “केदारनाथला जाताना जयपूरचे पायलट लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) राजवीर सिंग चौहान यांचं हेलिकॉप्टर अपघातात अकाली निधन होणं अत्यंत वेदनादायक आहे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि या कठीण काळात त्यांच्या कुटुंबाला शक्ती देवो. या दुःखाच्या वेळी संपूर्ण राज्य चौहान कुटुंबासोबत आहे.” या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
दरम्यान, राजवीर सिंग चौहान यांनी ऑक्टोबरमध्ये बेल ४०७ हेलिकॉप्टर उडवण्यास सुरुवात केली होती. ते २००९ मध्ये भारतीय सैन्यात सामील झाले होते आणि त्यांचं शेवटचं पद लेफ्टनंट कर्नल होतं. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्यांची भूमिका कठीण प्रदेशातील भागावर ऑपरेशन्सचं नियोजन आणि उड्डाण मोहिमा राबवणं होती. त्यांनी त्यांच्या प्रोफाइलमध्ये म्हटलं होतं की, “मी दुर्गम समुदायांवर परिणाम करणाऱ्या उपक्रमांचे नेतृत्व केलं आहे. प्राथमिक शाळा बांधण्यापासून ते आरोग्यसेवा केंद्र स्थापन करण्यापर्यंत आणि स्थानिक लोकांचं जीवनमान उंचावण्यापर्यंत. तसेच आंतरराष्ट्रीय सीमेवरील पंजाबच्या भूभागात देखील उड्डाणाच्या ऑपरेशन्सचं नियोजन आणि अंमलबजावणी मी केलेली आहे, असं चौहान यांनी त्यांच्या प्रोफाइलमध्ये म्हटलेलं आहे.
नेमकं कसा घडला अपघात?
उत्तराखंड या ठिकाणी हेलिकॉप्टरचा अपघात हा पहाटे ५.२० मिनिटांनी झाला. हे हेलिकॉप्टर केदारनाथहून गुप्तकाशीला चाललं होतं. मृतांमध्ये पाच प्रवासी, एक लहान मूल आणि हेलिकॉप्टर पायलट अशा सात जणांचा समावेश आहे. हे प्रवासी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात येथील होते. घटनास्थळी तातडीने एनडीआरएफ आणि एसडीआरफची पथकं रवाना झाली होती. दरम्यान ही मागच्या सहा आठवड्यातली पाचवी घटना आहे.