दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक होऊन आठवड्याच्यावर कालावधी उलटून गेला आहे. त्यांना १ एप्रिलपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे केजरीवालांच्या अटकेविरोधात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून दररोज निर्देशने करण्यात येत आहेत. अशात आता अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी ‘केजरीवालांना आशीर्वाद’ या नावाने व्हॉट्स अॅप मोहीम सुरू केली आहे.

हेही वाचा – अमेरिका, जर्मनी पाठोपाठ केजरीवाल प्रकरणात संयुक्त राष्ट्रांकडूनही चिंता व्यक्त; म्हणाले, “भारतातील प्रत्येकाचे…”

या मोहिमेंतर्गत सुनीता केजरीवाल यांनी एक व्हॉट्स अॅप नंबर शेअर केला आहे. अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देण्यासाठी देशातील नागरिकांनी या नंबर त्यांचे मेसेजरुपी आर्शीवाद पाठवावे, असं आवाहन सुनीता केजरीवाल यांनी केले आहे. “अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही व्हॉट्स अॅप मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार आम्ही एक व्हॉट्स अॅप नंबरही शेअर केला आहे. या नंबरवर तुम्ही केजरीवाल यांना तुमचे आशीर्वाद आणि प्रार्थनारुपी संदेश पाठवू शकता”, असे त्या म्हणाल्या.

न्यायालयीन सुनावणी दरम्यान सुनीता केजरीवाल स्वत: उपस्थित राहात आहेत. गेल्या सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना, “अरविंद केजरीवाल यांची प्रकृती बरी नाही. त्याच्या शरीरातील शूगर पातळी कमी जास्त होत आहे. त्यांचा छळही करण्यात येत आहे. मात्र, हा अत्याचार जास्त दिवस चालणार नाही. जनताच राज्यकर्त्यांना उत्तर देईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

हेही वाचा – मला तुरुंगात डांबणे हाच मोठा घोटाळा! केजरीवाल यांचा आक्रमक युक्तिवाद; कोठडीत चार दिवसांची वाढ

दरम्यान, गेल्या सुनावणीवेळी अरविंद केजरीवाल यांनी ईडीद्वारे आम आदमी पक्षावर दबाव आणला जात असल्याचा आरोप केला होता. “या प्रकरणात सीबीआयने ३१ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. तसेच २९४ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. याशिवाय ईडीने आतापर्यंत १६२ लोकांची चौकशी केली असून २५ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या सगळ्यात माझे नाव केवळ चार ठिकाणी आहे. तरी मला का अटक करण्यात आली आहे? हा एकप्रकारे ईडीच्या माध्यमातून आम आदमी पक्षावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे”, असे ते म्हणाले होते.