आठवडी बाजारात कत्तलीसाठीच्या जनावरांची खरेदी-विक्री करण्याच्या बंदीमागे गोमांसबंदीचा निर्णय अप्रत्यक्षपणे राबवण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप करत केरळ आणि मद्रासमध्ये आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मद्रासच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (आयआयटी) बीफ महोत्सव आयोजित करण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. काल रात्री पार पडलेल्या या बीफ महोत्सवात संस्थेतील साधारण ५० विद्यार्थी सहभागी झाल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी २७ मे रोजी स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसएफआय) कार्यकर्त्यांकडून त्रिवेंद्रम विद्यापीठाबाहेर अशाचप्रकारचे आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर केरळात अनेक ठिकाणी बीफ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तत्पूर्वी केरळमध्ये सार्वजनिक ठिकाणी गायीच्या वासराची कत्तल केल्याप्रकरणी सोमवारी युथ काँग्रेसच्या तीन कार्यकर्त्यांना सोमवारी पक्षातून निलंबित करण्यात आले. भाजप युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी कन्नूर युथ काँग्रेसचे अध्यक्ष राजील माकुट्टी यांच्यासह तीन जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे या तिघांनी गायीच्या एका वासराला सार्वजनिक ठिकाणी आणून त्याची कत्तल केली. त्यानंतर या वासराचे मांस लोकांना वाटण्यात आले. आठवडी बाजारात कत्तलीसाठी जनावरांची खरेदी आणि विक्री बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले होते. दरम्यान, काँग्रेसनेही या कृत्याचा निषेध करत कार्यकर्त्यांना निलंबित केले आहे. हे कृत्य म्हणजे अविचारी, रानटी आणि पूर्णपणे असमर्थनीय असल्याचे राहुल गांधी यांनी ट्विटरवरून सांगितले. तर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी अशा घटकांना काँग्रेसमध्ये स्थान नसल्याचे म्हटले.

पर्यावरण मंत्रालयाकडून आठवडी बाजारातील दुभत्या जनावरांच्या खरेदी विक्रीवर टाकण्यात आलेल्या बंदीवरून केरळमधील वातावरण दिवसेंदिवस तापताना दिसत आहे. आम्ही काय खावे हे दिल्ली आणि नागपूरकरांनी शिकवू नये असे सांगत केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. केरळमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान बोलत असताना त्यांनी भाजपच्या निर्णयावर सडकून टीका केली. केंद्रात सत्तेत असणारे सरकार आपल्या भूमिका देशभरात लादू पहात आहेत. मात्र केरळमधील लोकांच्या खाण्याच्या सवयी अतिशय चांगल्या असून दिल्ली आणि नागपूर मधून केरळी लोकांना खाण्याच्या बाबतीतले धडे घेण्याची आवश्यकता नाही, असे विजयन यांनी सांगितले. केरळी लोक खाण्याच्या आरोग्यदायी आणि पोषणमूल्ये असणाऱ्या पारंपरिक पद्धती अवलंबतात.

केरळमधील ज्येष्ठ नेते कोडीयेरी बालकृष्णन याबाबत म्हणाले, केंद्राकडून देशात सर्व ठिकाणी समान संस्कृतीसाठी आरएसएसचा अजेंडा राबविण्याचा आग्रह धरला जात आहे. एक देश, एक संस्कृती आणि एक पक्ष याचा आग्रह भाजपकडून होत आहे. केंद्र सरकारने दुभत्या जनावरांच्या विक्रीवर आणलेली बंदी याच दिशेने जाणारे एक पाऊल आहे, जे खपवून घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kerala youth congress workers suspended for slaughtering calf in public
First published on: 29-05-2017 at 12:32 IST