वृत्तसंस्था, नवी दिल्ली
राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली (रासुका) जोधपूर मध्यवर्ती कारागृहात कैदेत असलेले पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी लेहमधील हिंसाचार आणि त्यामध्ये चौघांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले जात नाहीत, तोपर्यंत वांगचुक यांनी तुरुंगात राहण्याची तयारी केली आहे, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली.

वांगचुक यांना झालेला अटक बेकायदा असून, त्यांची ताबडतोब सुटका करावी अशी मागणी करणारी हेबिअस कॉर्पस याचिका वांगचुक यांची पत्नी गीतांजली अंगमो यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेद्वारे त्यांनी वांगचुक यांना झालेल्या अटकेलाही आव्हान दिले आहे. या याचिकेवर सोमवारी न्या. अरविंद कुमार आणि न्या. एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. विवेक तनखा आणि सर्वम रितम खरे हे अंगमो यांची बाजू मांडणार आहेत.

लडाखला राज्याचा दर्जा दिला जावा, तसेच या केंद्रशासित प्रदेशाचा राज्यघटनेच्या सहाव्या परिशिष्टात समावेश करण्यात यावा या मागणीसाठी लेहमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागून चौघांचा मृत्यू झाला होता. आणि ९० जण जखमी झाले होते. या घटनेनंतर दोन दिवसांनी २६ सप्टेंबरला वांगचुक यांना कठोर ‘रासुका’खाली ताब्यात घेण्यात आले.

‘रासुका’खाली ताब्यात घेण्यात आलेल्या कैद्याला कोणत्याही खटल्याविना १२ महिने तुरुंगात ठेवण्याची तरतूद आहे. वांगचुक यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा दावा लडाख पोलिसांनी केला आहे. तर गृह मंत्रालयाने त्यांच्या स्वयंसेवी संस्थेला परदेशी निधी मिळण्यासाठी आवश्यक परवाना रद्द केला आहे.

तुरुंगात भेट

‘लेह शिखर संघटने’चे कायदा सल्लागार मुस्तफा हाजी आणि सोनम यांचे बंधू का त्सेतन डोर्जी ले यांनी शनिवारी जोधपूर तुरुंगात सोनम वांगचुक यांची भेट घेतली. त्यांनी सोनम यांना वाचण्यासाठी दोन पुस्तके दिली, तसेच त्यांनी काही कपडे आणि बूटही मागवले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही भेट ४० मिनिटे चालली. यावेळी सोनम वांगचुक यांनी हाजी मुस्तफा यांच्याकडे संदेश दिला.

मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बरा आहे. माझी चिंता करणाऱ्या आणि माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार. हिंसाचारात मृत्यू झालेल्या कुटुंबांचे मी सांत्वन करतो. या चौघांच्या मृत्यूची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे आणि तसे होत नाही, तोपर्यंत मी तुरुंगात राहायला तयार आहे. – सोनम वांगचुक, पर्यावरण कार्यकर्ते