सततच्या मुसळधार पावसाने माता वैष्णोदेवी मार्गावर भूस्खलन झाल्याने सहा भाविकांचा मृत्यू झाला तर १४ जण जखमी झाले. जम्मू आणि काश्मीरच्या रेसई जिल्ह्यात हे प्रसिद्ध देवस्थान आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे यात्रा स्थगित करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुसळधार पावसाने जम्मू भागात अनेक नद्यांना पूर आला आहे. दरड कोसळणे व झाडे पडण्याच्या घटनांमध्ये चार जण दगावले. त्यामुळे पावसाने जम्मूत मंगळवारी दहा जणांचा बळी गेला.
अधिकवारी येथील इंद्रप्रस्थ भोजशाळा येथे मदतकार्य वेगाने सुुरू आहे. दुपारी तीनच्या सुमारास भूस्खलनाने मोठे नुकसान झाले. खराब हवामानामुळे हिमकोटी मार्गावरील यात्रा मंगळवारी सकाळीच स्थगित करण्यात आली होती. जुन्या मार्गाने ती सुरू होती. मात्र पाऊस सुरूच असल्याने पुढील सूचना मिळेपर्यंत ही यात्रा थांबवण्यात आली. जम्मूत गेले तीन दिवस संततधार असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पावसाने काश्मीर खोऱ्यातील पायाभूत सुविधांना फटका बसला. अनेक छोटे पूल कोसळले, मोबाइल टॉवरही पडले तसेच विद्युतपुरवठाही काही भागांत खंडित झाला. जम्मू आणि काश्मीरमध्ये दूरध्वनी सेवा मोठ्या प्रमाणात बंद होती. जम्मू-श्रीनगर तसेच कीश्तवार-डोडा महामार्ग बंद होते. पुराने तसेच भूस्खलनाने १२ प्रमुख मार्ग बंद होते. जम्मूकडे येणाऱ्या तसेच येथून निघणाऱ्या अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या. कटरा येथे रुग्णालयात भाविकांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. काही जखमींना कटरा येथील नारायणा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
भाविक अडकले
माता वैष्णोदेवीकडे जाणाऱ्या मार्गावर भूस्खलनात सहा जणांचा बळी गेला. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. वेष्णोदेवीला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. हिमकोटी मार्गावरील यात्रा मंगळवारी सकाळीच स्थगित करण्यात आली होती. जुन्या मार्गाने ती दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू होती. मात्र सततच्या पावसाने खबरदारीचा उपाय म्हणून ती स्थगित करण्यात आली. दर्शन घेऊन परतत असताना, दगड खाली आल्याने भाविकांनी भीतीने आरडाओरडा केला. तेव्हा सुरक्षितस्थळी जाण्याच्या प्रयत्नात जखमी झाल्याचे पंजाबच्या मोहालीतील किरण यांनी आपला अनुभव वृत्तसंस्थेला विशद केला.