बिहारमधील पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांना लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पप्पू यादव यांनी आज माध्यमांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. याप्रकरणी पप्पू यादव यांनी बिहार पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहित सुरक्षेत वाढ करण्याची मागणीही केली. खासदार पप्पू यादव यांच्या तक्रारीनंतर बिहार पोलिसांनीही याप्रकरणाचा तपास सुरू केल्याची माहिती आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, लॉरेन्स बिष्णोई टोळीने पप्पू यादव यांना कॉल करत धमकी दिली आहे. यावेळी त्यांनी पप्पू यादव यांना सलमान खान प्रकरणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. आम्ही तुझ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेऊन आहोत. तू सलमान खान प्रकरणापासून दूर राहा, अन्यथा बाबा सिद्दिकींप्रमाणे तुझीही हत्या करू अशी धमकी फोन करणाऱ्याने दिल्याचं पप्पू यादव यांनी सांगितलं.

हेही वाचा – बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्यांदरम्यान सलमान खान परदेशात करणार शो; चाहते म्हणाले, “भाईजान वाघासारखा…”

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईत बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई टोळीने घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पप्पू यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लॉरेन्स बिष्णोई टोळीला लक्ष्य केलं होतं. कायद्याने परवानगी दिली तर लॉरेन्स बिष्णोई सारख्या गुंडाचे नेटवर्क २४ तासांत उद्ध्वस्त करेन, असे ते म्हणाले होते.

हेही वाचा – सासरच्या जाचाला कंटाळलेल्या जावयानं सुटकेसाठी थेट लॉरेन्स बिश्नोईचं घेतलं नाव; पोलीसही चक्रावले!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय २५ ऑक्टोबर रोजी पप्पू यादव यांनी मुंबईला जात सिद्दिकी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. तसेच त्यावेळी त्यांनी सलमान खानला भेटण्याचाही प्रयत्नही पप्पू यादव केला होता. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नव्हती. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सलमान खानशी फोनवर सविस्तर बोलणं झाले. तो निर्भयपणे काम करतो आहे. मी त्याच्याबरोबर आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता खासदार पप्पू यादव यांना लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती आहे.