महिलांना सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त करणे तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी केवळ कायदे करूनच भागणार नाही तर त्यांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होणे अतिशय गरजेचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी शनिवारी केले.
नवीन कायदे केल्याने परिस्थिती बदलणार नाही तर त्यांच्या योग्य अंमलबजावणीसाठी यंत्रणा राबणे आवश्यक आहे. केवळ कायदे करून महिलांना बंधनातून मुक्त करता येणार नाही, असे राष्ट्रपती यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पाश्र्वभूमीवर केलेल्या भाषणात म्हटले आहे. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना स्त्री-शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महिलांबाबतचा आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. आपल्या माता, भगिणींचा आदर केला पाहिजे. गृहिणी, माता, शिक्षिका, महिला उद्योजक, अवकाश, संशोधन अशा सर्वच क्षेत्रांत महिला आपली कर्तबगारी दाखवीत आहेत. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला विविध क्षेत्रांत उंच भरारी घेत देशाच्या उभारणीत हातभार लावत आहेत, असेही राष्ट्रपती यावेळी म्हणाले.