पीटीआय, नवी दिल्ली

द्रमुकचे नेते आणि तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेले, सनातन धर्माचे निर्मूलन करा, हे वक्तव्य द्वेषकारक असल्याची तक्रार देशातील २६२ नामवंत व्यक्तींनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना लिहिलेल्या पत्रात केली असून याची दखल न्यायालयाने घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. या पत्रावर दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एस. एन. धिंग्रा यांच्यासह १४ माजी न्यायाधीश, १३० माजी अधिकारी आणि सैन्य दलांच्या ११८ माजी अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. धिंग्रा यांनी सांगितले की, उदयनिधी यांनी द्वेषमूलक भाषण तर केलेच, शिवाय त्याबद्दल माफी मागण्यास नकारही दिला.

पत्रात म्हटले आहे की, उदयनिधी यांचे वक्तव्य हे नि:संदिग्धपणे भारताच्या मोठय़ा जनसमुदायाविषयी द्वेष प्रकट करणारे आहे. या वक्तव्यातून भारतीय राज्यघटनेचा गाभा असलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वावर हल्ला करण्यात आला आहे. याबद्दल आम्हाला मोठी चिंता वाटते. देशाचे धर्मनिरपेक्ष स्वरूप जपण्यासाठी या प्रकरणात कारवाई होणे गरजेचे आहे. अशा गंभीर प्रकरणात प्रशासनाने कारवाई न केल्यास तो न्यायालयाचा अवमान ठरेल. राज्य सरकारने याप्रकरणी कारवाईस नकार देत न्यायालयाचा अवमानच केला आहे. याची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत तमिळनाडू सरकारवर जबाबदारी निश्चित करावी. अशी द्वेषकारक वक्तव्ये टाळण्यासाठी तसेच शांतता आणि कायदा- सुव्यवस्था राखण्यासाठी न्यायालयाने आवश्यक ती पावले उचलावीत, असे आवाहन पत्रात करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>भारताने ३.५९ लाख हेक्टर जंगल गमावले ;२० वर्षांच्या तुलनेत दुप्पट वृक्षाच्छादन आगीच्या कवेत

द्वेषपूर्ण भाषणांच्या प्रकरणात अधिकाऱ्यांनी तक्रारीची वाट न पाहता स्वत:हून कारवाई करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता, याकडे पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे.

भाजपकडून हिटलरशी तुलना

नवी दिल्ली : हिटलरने ज्याप्रमाणे ज्यू धर्मीयांना वेगळे पाडून त्यांचा वंशविच्छेद करण्यासाठी बळी घेतले, त्याच धर्तीवर द्रमुकनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी भारतात सनातन धर्माचे पालन करणाऱ्या ८० टक्के लोकांच्या वंशविच्छेदाची स्पष्ट हाक आपल्या द्वेषपूर्ण भाषणातून दिली आहे, असा आरोप भाजपने मंगळवारी एक्सवरील निवेदनात केला. स्टॅलिन यांच्या अशा विखारी वक्तव्यांना काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा पाठिंबा असल्याची बाब अस्वस्थ करणारी आहे, असेही भाजपने म्हटले आहे.

हेही वाचा >>>जी-२०च्या यशासाठी एकत्रित प्रयत्नांना तयार; चीनचे स्पष्टीकरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परस्परांचा आदर करावा- केजरीवाल

मी सनातन धर्माचा आहे, तुमच्यापैकी अनेक जण या धर्माचे पालन करतात. आपण एकमेकांच्या धर्माचा आदर केला पाहिजे, चुकीची विधाने टाळली पाहिजेत, अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी मंगळवारी व्यक्त केली. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी ही भावना व्यक्त केली.