|| मधु कांबळे
मुंबईतील बहुभाषिक, बहु सांस्कृतिक तोंडवळा असलेला दक्षिण-मध्य मुंबई हा मतदारसंघ तसा कोणत्याही पक्षाचा बालेकिल्ला आहे, असे म्हणता येणार नाही. मात्र या मतदारसंघात काँग्रेस व शिवसेनेच्या वर्चस्वाची लढाई अनेकदा झाली. त्यात आलटून-पालटून दोन्ही पक्ष यशस्वी झाले. मागील निवडणुकीत नरेंद्र मोदी लाटेत भुईसपाट झालेला काँग्रेस पक्ष आता पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहे. निवडणुका जिंकण्याचे खास कसब असलेले परंतु मागील निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेसचे एकनाथ गायकवाड या कसलेल्या उमेदवाराचा शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्याशी अटीतटीचा सामना होणार आहे.
लहान व्यापारी, कष्टकरी, मध्यम व निम्न मध्यमवर्गीयांचा हा मतदारसंघ आहे. १९९० नंतर शिवसेनेने संसदीय राजकारणात मुसंडी मारली, तेव्हापासून हा मतदारसंघ कधी शिवसेनेकडे तर कधी काँग्रेसकडे राहिला. २००४ मध्ये लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष मनोहर जोशी यांचा पराभव केल्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या गायकवाड यांचा नवख्या राहुल शेवाळे यांनी मागील निवडणुकीत दारुण पराभव केला. आता या दोघांमध्येच पुन्हा सामना होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतील असलेल्या शेवाळे यांच्या प्रचारात शिवसेनेची फौज मोठय़ा ताकदीनिशी उतरली आहे. राहुल शेवाळे आपल्या प्रचारात खासदार म्हणून गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात केलेल्या अनेक कामांची जंत्री लोकांसमोर मांडतात. एकनाथ गायकवाड त्यांच्या प्रचारात राहुल शेवाळे हे अकार्यक्षम खासदार असल्याचा आरोप करतात.
मनसेची साथ : सध्या या मतदारसंघातील दोन विधानसभा मतदारसंघ भाजपकडे, दोन शिवसेनेकडे आणि दोन काँग्रेसकडे आहेत. काँग्रेसकडील एक वडाळा मतदारसंघातील आमदार कालिदास कोळंबकर हे राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी उघडपणे मैदानात उतरले आहेत. त्याचे काही प्रमाणात गायकवाड यांना नुकसान आहे. पक्षसंघटना म्हणून कमकुवत असलेल्या दादर-माहीम भागात काँग्रेसला मनसेची साथ मिळाली आहे. मनसेचे कायर्कर्ते उघडपणे गायकवाड यांचा प्रचार करीत आहेत. गायकवाड यांची सारी मदार ही धारावीवर आहे.