लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात जम्मूमधील उधमपूर मतदारसंघातून केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह सलग तिसऱ्यांदा रिंगणात आहेत. त्यांच्यापुढे काँग्रेसचे आव्हान आहे. विशेष म्हणजे काँग्रेसला नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमॉक्रेटिक पक्षाने पाठिंबा दिलाय. तर आसाम जोरहट मतदारसंघातून काँग्रेसचे युवा नेते गौरव गौगोई निवडणूक लढवत आहेत.

उधमपूर (जम्मू)

भौगोलिकदृष्टय़ा देशातील सर्वात मोठा मतदारसंघ अशी याची ओळख. विधानसभेचे एकूण १७ मतदारसंघ यामध्ये येत असून, किश्तवाड, डोडा, कथुआ आणि उधमपूर अशा जिल्ह्यांचा हा मतदारसंघ. त्यातील कथुआ, उधमपूर हा हिंदूबहुल भाग तर डोडा, रामबन येथे प्रामुख्याने मुस्लीम वस्ती आहे. अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर ही पहिलीच निवडणूक तर त्याचबरोबर पायाभूत सुविधांची कामे मोठय़ा प्रमाणात झाल्याचा मुद्दा भाजप उमेदवार व केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह मांडत आहेत. काँग्रेसने माजी खासदार लालसिंह यांना उमेदवारी दिली. मतदारांमध्ये ते लोकप्रिय आहेत. त्यामुळे जितेंद्र सिंह यांच्यापुढे आव्हान आहे. गेल्या दोन निवडणुकांत त्यांनी विजय मिळवला आहे. नॅशनल कॉन्फरन्स तसेच पीडीपीच्या पाठिंब्याने काँग्रेसला यंदा विजयाची आशा आहे.

जोरहट (आसाम)

काँग्रेसचे लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई यांच्या उमेदवारीने आसाममधील जोरहट हा मतदारसंघ चर्तेत आहे. त्यांचा सामना भाजपचे विद्यमान खासदार तपन गोगोई यांच्याशी आहे. गौरव हे त्यांच्या कलिबोर या मतदारसंघाऐवजी येथून लढत आहेत. मात्र ही लढत गौरव यांच्याविरोधात मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा अशीच झाली आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे प्राबल्य होते. मात्र २०१४ पासून येथे भाजपचे वर्चस्व आहे. गौरव यांच्यासाठी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची प्रचार केला. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय अशी गौरव गोगोई यांची ओळख असून, लोकसभेत काँग्रेसची बाजू त्यांनी जोरदारपणे मांडली होती. काँग्रेससाठी त्यांचा विजय महत्त्वाचा आहे.

हेही वाचा >>>इस्रायलवर केलेला हल्ला इराणला भोवणार, अमेरिकेने उचललं ‘हे’ मोठं पाऊल

दक्षिण चेन्नई  (तमिळनाडू)

द्रमुकचा बालेकिल्ला अशी दक्षिण चेन्नई मतदारसंघाची ओळख. द्रमुकचे संस्थापक अण्णादुराई काँग्रेस नेते टी.टी.कृष्णाम्माचारी, आर. वेंकटरमण यांनी यापूर्वी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मोठय़ा प्रमाणात मध्यमवर्गीय वस्ती याचबरोबर माहिती-तंत्रज्ञान कंपन्या येथे मोठय़ा प्रमाणात आहे. भाजपने या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपने माजी प्रदेशाध्यक्ष व तेलंगणाच्या माजी राज्यपाल तमिळसाई सौंदराजन यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना द्रमुकच्या खासदार तमिझाची थंगनपंडियन यांच्याशी आहे. अण्णा द्रमुककडून डॉ. जे. जयवर्धन रिंगणात आहेत. त्यांनी २०१४ मध्ये येथून विजय मिळवला होता. वाहतूक समस्या तसेच पावसाळय़ात सखल भागात घरांमध्ये पाणी जाऊन मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. हे प्रमुख मुद्दे येथे प्रचारात आहेत.

कूचबिहार, प. बंगाल

निवडणूक आयोगाच्या मतदारसंघांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या पश्चिम बंगालमधील कुचबिहार येथे भाजपने विद्यमान खासदार नितीश प्रामाणिक यांना पुन्हा संधी दिली आहे. पश्चिम बंगालला मंत्री परिषदेत प्रतिनिधित्व देताना प्रामाणिक यांना पहिल्याच कालखंडात राज्यमंत्रीपद मिळाले. ‘राजबंशी’ या समाजातील प्रामाणिक यांच्यासमोर या वेळी तृणमूलने त्याच समाजातील जगदीश चंद्र बर्मा यांना रिंगणात उतरविले आहे. या मतदारसंघात ३५ टक्के लोकसंख्या याच राजबंशी समाजाची आहे. २०१९मध्ये प्रामाणिक यांचा ५० हजार मतांनी विजय झाला होता. या वेळी समाजाची मते विभागली जाण्याची भीती असली, तरी भाजपच्या उमेदवारांनी ही शक्यता फेटाळून लावली. समाजाचा पहिला खासदार भाजपने लोकसभेत पाठविला. राजा अनंत महाराज यांनाही भाजपनेच प्रथम राज्यसभेत पाठविले. त्यामुळे समाज आपल्या पाठीशी असल्याचा प्रमाणिक यांचा दावा आहे. तर एकदा केलेली चूक लोक पुन्हा करणार नाहीत, असे म्हटले आहे.

बिकानेर, राजस्थान

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ २००९मध्ये भाजपने हिरावून घेतला. केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी २००९, २०१४ आणि २०१९ अशा सलग तीन निवडणुका काँग्रेसला मतदारसंघात पाय रोऊ दिलेले नाहीत. आताही भाजपने त्यांना चौथ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतविले आहे. काँग्रेसने गोविंदराम मेघवाल यांना या मतदारसंघात उमेदवारी दिली आहे.   गेल्या तिन्ही निवडणुकांमध्ये अर्जुनराम मेघवाल विक्रमी मतांनी विजयी झाले होते. याउलट त्यांचे विरोधक प्रथमच लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. गोविंदराम हे अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळात आपत्ती व्यवस्थापन मंत्री होते. केंद्रीय मंत्री मेघवाल यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.