अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अटकेप्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राज्य सरकारकडून सविस्तर माहिती मागवली आहे. ओम बिर्ला यांनी २४ तासात ही माहिती सोपवण्यास सांगितलं आहे. नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांकडून अमानवीय वागणूक दिली जात असल्याची तक्रार करणारं पत्र लिहिल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी ही माहिती मागवली आहे. इंडियन एक्स्प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्रालयाच्या मार्फत ही माहिती मागवण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रक्षोभक विधाने करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी खार पोलिसांनी राणा दांपत्याला अटक केली आहे. यादरम्यान नवनीत राणा यांनी खार पोलिसांवर अनुसूचित जातीची असल्याने भेदभाव करणार वागणूक दिली असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी याप्रकरणी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे.

खार पोलीस ठाण्यात जातीवरुन माझा छळ; रात्रभर…; नवनीत राणांचे गंभीर आरोप; लोकसभा अध्यक्षांना पत्र

दरम्यान नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपावंर पोलिसांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, खार पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्हीमधून तसंच इतर कैद्यांचा जबाबातून हे आरोप खोटे असल्याचं सिद्ध होईल. नवनीत राणा यांना रविवारी संध्याकाळी भायखळा महिला कारागृहात हलवण्यात आलं.

Hanuman Chalisa Row: ‘…काही अपेक्षा करणं चुकीचं आहे”, मुंबई हायकोर्टाने राणा दांपत्याला सुनावलं; याचिका फेटाळली

तसंच अधिकाऱ्याने नवनीत राणांच्या अटकेसंबंधी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्यात आला नसल्याचं सांगितलं आहे.

नवनीत राणा यांनी पत्रात काय म्हटलं आहे –

“मी केवळ मुख्यमंत्र्यांच्या घऱाबाहेर हनुमान चालिसा म्हणायची परवानगी मागितली होती. आणि मी तेवढंच करणार होते. कोणत्याही धार्मिक भावना भडकावण्याचा माझा हेतू नव्हता. मी मुख्यमंत्र्यांना म्हटलं होतं की, तुम्हीही या. मात्र यामुळे कदाचित कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून मी सांगितलं की मातोश्रीवर जाणार नाही. त्याऐवजी माझ्या खारमधील राहत्या घरीच हनुमान चालिसा म्हणणार आहे,” अशी माहिती नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात दिली आहे.

“पोलिसांनी मला २३ तारखेला अटक केली. रात्रभर खार पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं. त्यावेळी मी अनेक वेळा पिण्यासाठी पाणी मागितलं. तरी मला रात्रभर पाणी दिलं नाही. मला धक्का तर तेव्हा बसला जेव्हा मला पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मी अनुसुचित जातीची असल्याने त्यांच्या भांड्यात पाणी मिळणार नाही असं सांगितलं. हा सरसरळ माझा जातीवरुन केलेला अपमान आहे,” असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

“मला रात्रभर बाथरुमही वापरु दिलं नाही. अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेत मला शिवीगाळ केली गेली. अनुसुचित जातीच्या लोकांना आम्ही आमचं बाथरुम वापरु देत नाही असंही सांगितलं,” असा दावा नवनीत राणा यांनी केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha speaker seeks details of mp navneet rana arrest from maharashtra government sgy
First published on: 26-04-2022 at 11:35 IST