भोपाळमधील १८०० कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणातील संशयित आरोपीने पोलीस ठाण्यात दाखल होत स्वत: गोळी झाडून घेतली आहे. यात आरोपी जखमी झाला आहे. यावेळी पोलिसांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. प्रेमसुख पाटीदार असं या संशयित आरोपीचं नाव आहे. चौकशीपासून वाचण्यासाठी त्याने स्वत:वर गोळी झाडून घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.

‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी गुजरात एटीएस आणि ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ (एनसीबी)ने मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला होता. या कारवाईत जवळपास १८०० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. तसेच हरीश अंजुना नावाच्या एका व्यक्तीला अटकही करण्यात आली होती.

हेही वाचा – प्लॅटफॉर्मवर उभ्या प्रवाशाची चालत्या ट्रेनमधून कॉलर पकडली; फरफटत नेलं अन्…रेल्वे स्टेशनवरचा थरारक VIDEO व्हायरल

आरोपीने स्वत:च्या पायावर झाडली गोळी

हरीश अंजुनाने तपासदरम्यान प्रेमसुख पाटीदार याचे नाव घेतलं होतं. तेव्हापासून एनसीबीची टीम प्रेमसुख पाटीदारच्या शोधात होती. त्याच्या राहत्या घरी जाऊन शोध घेण्यात असता, एनसीबीने छापा टाकला तेव्हापासून तो फरार असल्याचे त्यांच्या लक्षात आलं. अशात शुक्रवारी संशयित आरोपी प्रेमसुख पाटीदारने मंदसौरमधील एका पोलीस ठाण्यात दाखल होत स्वत:च्या पायावर गोळी झाडली. यात तो जखमी झाला. दरम्यान, पोलिसांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती आता स्थिर असून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आरोपीची चौकशी करण्यात येईल, अशी महिती मंदसौरचे पोलीस अधिक्षक अभिषेक आनंद यांनी दिली.

एनसीबीच्या तपासदरम्यान हरीश अंजुनाने ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारे साहित्य महाराष्ट्रातून तर केमिकल गुजरातच्या वलसाडमधून आणल्याची कबुली दिली होती. तसेच त्याने प्रेमसुख पाटीदारच्या नावाचा उल्लेख केला होता. प्रेमसुख पाटीदारबरोबर तो ड्रग्जचा व्यापार करत असून तो मुख्य सप्लायर असल्याचे हरीश अंजुनाने सांगितलं होतं.

हेही वाचा – विश्लेषण : देशातल्या पहिल्या वातावरणीय संशोधन प्रयोगशाळेसाठी भोपाळचीच निवड का? काय आहे तिचे महत्त्व?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५ ऑक्टोबर रोजी एनसीबीने केली होती कारवाई

५ ऑक्टोबर रोजी गुजरात एटीएस आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने भोपाळमधील एका कारखान्यावर छापा टाकला होता. यावेळी कोट्यवधींचा ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला होता. कटारा हिल्स पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बागरोडा गावातील औद्योगिक परिसरात ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत ड्रग्जसाठी लागणारा कच्चा माल तसेच साहित्य जप्त करण्यात आले होते. याठिकाणी मेफेड्रोन तयार करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितलं होतं.