Madhya Pradesh Crime News : मध्य प्रदेशमधील एका सरकारी महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांना महिलांचे कपडे बदलत असताना त्यांचे फोटो काढल्याप्रकरणी, लपून व्हिडीओ रेकॉर्ड केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मंदसौर जिल्ह्यातील एका महाविद्यालयात मंगळवारी युवक महोत्सवादरम्यान हा प्रकार घडला. पोलिसांनी सांगितलं की सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय की चार पुरुष महिलांच्या कपडे बदलण्यासाठीच्या खोलीच्या खिडकीजवळ लपून त्यांचे फोटो व व्हिडिओ चित्रित करत होते.

पोलिसांनी सांगितलं की महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्यांनी याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर आम्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी अटक केलेल्या तिन्ही विद्यार्थ्यांचं वय २० ते २२ वर्षांच्या दरम्यान आहे. उमेश जोशी, अजय गौड व हिमांशू बैरागी अशी या तीन मुलांची नावं आहेत.

एबीव्हीपीचा पदाधिकारी गजाआड

अटक केलेल्या आरोपींपैकी उमेश जोशी हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा शहर सचिव होता. तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संबंधित होता. या घटनेनंतर त्याला संघाने व एबीव्हीपीने त्याच्या पदावरून हटवलं आहे. दरम्यान, पोलीस चौथ्या आरोपीचा शोध घेत आहेत. तो सध्या फरार आहे. दी इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

पोलिसांनी काय सांगितलं?

मंदसौरचे पोलीस अधीक्षक विनोद मीना यांनी सांगितलं की घडलेल्या प्रकारानंतर तीन विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. आम्ही सध्या चौथ्या आरोपीचा शोध घेत आहोत.

“सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय की चार मुलं खिडकीतून डोकावून मुलींना पाहण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या हातात मोबाईल दिसत आहेत. ते कपडे बदलण्याच्या खोलीत डोकावून फोटो व व्हिडीओ काढत आहेत. कार्यकारी प्राचार्यांच्या तक्रारीनंतर आम्ही चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी तिघांना अटक केली आहे. चौथा आरोपी सध्या फार आहे. अटक केलेल्या विद्यार्थ्यांचे मोबाइल फोन जप्त केले असून सध्या त्यांची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे.”

एबीव्हीपीची प्रतिक्रिया

या घटनेवर एबीव्हीपीने म्हटलं आहे की चार विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये पाहणी केली होती. कारण त्या खोलीत काही शंका उपस्थित करणाऱ्या घटना घडल्या होत्या.