Yogi Adityanath Declared New District for Maha kumbh Mela 2025: बारा वर्षांतून एकदा होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये जोरदार तयारी चालू आहे. महाकुंभमेळ्याच्या परिसरामध्ये व्यवस्था आणि इतर बाबींच्या तरतुदीसाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या बाबींवर काम केलं जात आहे. अवघ्या दोन महिन्यांवर महाकुंभमेळा आलेला असताना देशभरातल्या भाविकांनी प्रयागराजला जाण्याची तयारी सुरू केली आहे. त्यातच उत्तर प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाकुंभ मेळ्यासाठी एक आख्खा स्वतंत्र जिल्हाच योगी सरकारनं जाहीर केला आहे. या जिल्ह्याचं पूर्ण व्यवस्थापन स्वतंत्र असेल. शिवाय या जिल्ह्याचं नावदेखील महाकुंभमेळ्यावरूनच ठेवण्यात आलं आहे.

पुढील वर्षी १३ जानेवारी रोजी महाकुंभ मेळ्याला सुरुवात होईल. २६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत हा भक्तीसोहळा चालेल. प्रयागराजमध्ये दर १२ वर्षांनी महाकुंभ मेळ्याचं आयोजन केलं जातं. यामध्ये लाखोंच्या संख्येनं देश-विदेशातून भाविक, साधू, तपस्वी येतात. प्रशासनाला या काळात या भागातील व्यवस्थापनासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला जातो. आत्तापर्यंत प्रयागराज जिल्हा प्रशासनाकडून महाकुंभमेळ्याचं व्यवस्थापन पाहिलं जात होतं. पण आता महाकुंभमेळ्यासाठी स्वतंत्र जिल्ह्याची घोषणा करण्यात आली आहे.

काय असेल नवीन जिल्ह्याचं नाव?

प्रयागराजमधील ज्या भागात महाकुंभमेळा भरवला जातो, त्या संपूर्ण भागाचा एक जिल्हा घोषित करण्यात आला आहे. त्या जिल्ह्याला ‘महा कुंभ मेळा’ असं नामकरण करण्यात आलं आहे. या जिल्ह्याचं व्यवस्थापन पूर्ण स्वतंत्रपणे होईल. महा कुंभ मेळ्याचं आयोजन आणि त्यासंदर्भातल्या सर्व बाबींची पूर्तता व्यवस्थितपणे व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं उत्तर प्रदेश सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

प्रयागराजचे जिल्हाधिकारी रविंद्र कुमार मांदाद यांच्यानावे यासंदर्भातलं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. २३ नोव्हेंबर २०२४ रोजीची ही अधिसूचना असून त्यात स्वतंत्र जिल्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये महा कुंभ मेळा जिल्ह्याच्या सीमाही निश्चित करण्यात आल्या असून त्याचं व्यवस्थापन कसं असेल, तेही नमूद करण्यात आलं आहे. त्यानुसार महाकुंभमेळा व्यवस्थापन समितीतील प्रमुख कार्यकारी न्यायदंडाधिकारी, जिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असतील.

योगी आदित्‍यनाथ म्हणतात,‘ हिंदूंच्‍या धार्मिक मिरवणुकांवर दगडफेक करणाऱ्यांना धडा…’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान मोदी घेणार आढावा

दरम्यान, दोन महिन्यांवर आलेल्या महा कुंभ मेळ्याच्या व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत. यावेळी महा कुंभ मेळ्याचं व्यवस्थापन आणि सुरक्षा तरतुदींसदर्भात बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे.