Mahua Moitra on Delhi Fish Market Video : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी भारतीय जनता पार्टीवर आरोप केला आहे की त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीमधील चित्तरंजन पार्कमधील एका मासळी बाजारात जाऊन धुडगूस घातला. हा मासळी बाजार एका मंदिराच्या जवळ आहे म्हणून त्यांनी या बाजारातील मासे विक्रेत्यांची दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी म्हटलं आहे. मोइत्रा यांनी एक्सवर यासंबंधीचा कथित व्हिडीओ शेअर केला आहे. दुसऱ्या बाजूला, भारतीय जनता पार्टीने मोइत्रा यांचे आरोप फेटाळले आहेत. हा फेक व्हिडीओ असल्याचं भाजपाने म्हटलं आहे.

महुआ मोइत्रा यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं की “बाजारातील गुंडांची हिंमत बघा. ते आमच्या संवैधानिक अधिकाऱ्यांवरच हल्ले करत आहेत. त्यांनी इतका राडा करूनही पोलिसांनी त्या गुंडांना पकडलं नाही. कल्पना करा की असंच कृत्य एखाद्या मुसलमानाने केलं असतं तर काय झालं असतं? या देशात जगण्यासाठी आता आम्ही फक्त ढोकळा, मशरूम आणि मखाना खायचा का? आणि दिवसातून तीन वेळा जय श्रीराम म्हणायचं का?”

दिल्लीतील चित्तरंजन पार्क सीआर पार्क म्हणून ओळखलं जातं. हा दक्षिण दिल्लीमधील भाग आहे. या भागात प्रामुख्याने बहुसंख्य बंगाली नागरिक राहतात. हा परिसर बंगाली निर्वासितांना राहण्यासाठी देण्यात आला होता. या भागात बंगाली लोकांची दुकाने आहेत, एक छोटा मासळी बाजार देखील आहे.

आम्ही काय खायचे ते भाजपावाले आम्हाला सांगणार का? महुआ मोइत्रांचा प्रश्न

महुआ मोइत्रा यांनी बुधवारी एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की “तुम्ही पाहू शकता की दिवसाढवळ्या भाजपाचे गुंड कसे दुकानदारांना धमकावत आहेत. त्यांना सांगत आहेत की तुम्ही सीआर पार्कमध्ये दुकानं लावू शकत नाही, मासे विकू शकत नाही. आता आम्ही काय खावं आणि दुकानं कुठं थाटावी ते भाजपावाले आम्हाला सांगणार का? या गुंडांची इतकी हिंमत कशी काय होते? या भाजपाच्या गुंडांवर कारवाई का होत नाही?”

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा म्हणाल्या, “भाजपा ही केवळ मुस्लीमविरोधी नाही, तर ती तितकीच हिंदूविरोधी देखील आहे. हा पक्ष संविधानविरोधी आहे. आम्ही नेहमी सांगत आलेलो आहोत की हा पक्ष हिंदूंसाठी नाही. या मासळी बाजारात मासे विकणारे दुकानदार हिंदूच आहेत.”