केंद्र सरकारने तब्बल १२०० कोटी रुपये खर्च करून देशाच्या नवीन संसद भवनाची निर्मिती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ मे रोजी या संसद भवनाचं उद्घाटन करतील. पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणाऱ्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून राजकारण तापलं आहे. याप्रकरणी विरोधी पक्ष काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि भारतीय जनता पार्टीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन हे पंतप्रधानांनी नव्हे तर, राष्ट्रपतींनी करावं, अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा सचिवालयाने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना नव्या संसद इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी निमंत्रण दिले. त्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विटरवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले, संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन हे राष्ट्रपतींच्या हस्ते झालं पाहिजे, पंतप्रधानांच्या नव्हे.

दरम्यान, आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेदेखील याबाबत आक्रमक झाले आहेत. मल्लिकार्जुन खरगे यांनी लागोपाठ चार ट्वीट करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. या ट्वीटमध्ये खरगे यांनी म्हटलं आहे की, केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने एका दलित आणि आदिवासी समाजातील स्त्रीला राष्ट्रपती बनवलं आहे. संसदेची पायाभरणी केली तेव्हा तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निमंत्रित केलं नव्हतं, आता उद्घाटनाच्या कार्यक्रमाला द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित करण्यात आलेलं नाही.

हे ही वाचा >> पापुआ न्यू गिनी आणि फिजीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा सन्मान, दोन्ही देशांनी सर्वोच्च पुरस्काराने केला गौरव

खरगे यांनी म्हटलं आहे की, संसद ही भारतीय प्रजासत्ताकाची सर्वोच्च विधिमंडळ संस्था आहे आणि राष्ट्रपती हा त्या संस्थेचा सर्वोच्च घटनात्मक अधिकारी आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या देशाच्या प्रथम नागरिक आहेत. मुर्मू या भारत सरकार आणि विरोधी पक्षांचे तसेच प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रपतींनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन केलं तर ते लोकशाही मूल्यांप्रती सरकारच्या बांधिलकीचं प्रतीक ठरेल. भाजपा आणि आरएसएसच्या या सरकारमध्ये सातत्याने राष्ट्रपतीपदाचा अपमान होत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mallikarjun kharge says election of presidents from dalit and tribal for only electoral gains asc
First published on: 22-05-2023 at 13:48 IST