रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियानं एक पाहणी केली. पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, या पाहणीतून व्यवहार घटल्याचं दिसून आलं आहे. पाहणीनुसार वर्षाभरापूर्वीच्या खरेदी-विक्रीशी तुलना केल्यास जूनमधील पहिल्या पंधरा दिवसात मॉल्सच्या व्यवसायात ७७ टक्क्यांची घट झाल्याचं दिसून आलं आहे. म्हणजे सध्याची उलाढाल पूर्वीच्या तुलनेत २५ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. २३ टक्केच उलाढाल मागील पंधरा दिवसात झाली आहे.
केवळ मॉल्समधील दुकानांच्या खरेदी विक्रीतच घट झालेली नाही. बाजारपेठांमधील इतर व्यावसायिकांनाही फटका बसला आहे. त्यांच्या व्यवसायात ६१ टक्क्यांची घट झाल्याचं पाहणीत दिसून आलं आहे. लॉकडाउन शिथिल झाला असला, तरी ग्राहकांची खरेदी इच्छाशक्ती कमी असल्यानं त्याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
लॉकडाउन शिथिल केल्यानंतर त्याचा किरकोळ विक्रेत्यांना फारसा परिणाम झाल्याचं दिसत नाही. त्यांचा किरकोळ व्यापाऱ्यांच्या व्यवसायातही फारशी वाढ झाल्याचं दिसून आलेलं नाही. “ग्राहकांची खरेदीशक्ती कमी होत असल्याचं दिसून आलं. अलीकडेच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात असं दिसून आलं आहे की, लॉकडाउननंतर ५ पैकी ४ ग्राहकांनी आपल्या खरेदी खर्चात कपात केली आहे,” असं रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियानं म्हटलं आहे.