माणुसकीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित व्हावं, अशा घटनांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागलं आहे. छत्तीसगडमध्ये घडलेल्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओमध्ये मोठा वाद निर्माण झाला असून त्यासंदर्भात थेट छत्तीसगडचे आरोग्यमंत्री टी. एस. सिंह देव यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. आपल्या ७ वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन एका बापानं आपल्या घरापर्यंत १० किलोमीटरची पायपीट केल्याचा प्रकार आता समोर आला असून त्यावरून सरकारी यंत्रणांच्या असंवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्यानंतर त्यावरून गहजब उडाला. हा प्रकार छत्तीसगडच्या लखनपूर गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर घडला. इश्वर दास असं या व्यक्तीचं नाव असून शुक्रवारी सकाळी त्यांनी त्यांची ७ वर्षांची मुलगी सुरेखाला लखनपूरच्या आरोग्य केंद्रावर आणलं होतं. तिला अस्वस्थ वाटू लागल्याने ते तिला घेऊन आले होते.

यासंदर्भात स्थानिक आरोग्य अधिकारी डॉ. विनोद भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीची ऑक्सिजनची पातळी फार कमी झाली होती. ती ६० पर्यंत खाली आली होती. गेल्या काही दिवसांपासून तिला वारंवार ताप येत असल्याची तक्रार तिच्या पालकांनी केली होती. तिच्यावर आवश्यक ते उपचार सुरू करण्यात आले. मात्र, तिची परिस्थिती इतकी खालावली होती, की उपचारांना यश येऊ शकलं नाही आणि शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.

कुटुंबीयांनी न ऐकल्याचा प्रशासनाचा दावा

दरम्यान, “आम्ही मुलीच्या कुटुंबीयांना सांगितलं की तिचा मृतदेह घेऊन जायला शववाहिनी लवकरच येईल. पण त्यांनी आमचं ऐकलं नाही. शववाहिनी ९ वाजून २० मिनिटांनी आली. पण तोपर्यंत मुलीचे कुटुंबीय तिचा मृतदेह घेऊन गेले होते”, अशी प्रतिक्रिया डॉ. भार्गव यांनी दिली आहे.

चौकशीचे आदेश

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावरून वाद सुरू झाला. त्यानंतर छत्तीसगडचे आरोग्यमंत्री टी. एस. सिंह देव यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. “मी तो व्हिडीओ पाहिला. तो व्हिडीओ सुन्न करणारा आहे. मी यासंदर्भात वरीष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत”, असं देव यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man carrying daughter deadbody on shoulders chhattisgarh video viral pmw
First published on: 26-03-2022 at 14:13 IST