Raja Raghuvanshi Murder Case : राजा रघुवंशी हत्या प्रकरणाची देशभरात मोठी चर्चा सुरु आहे. मध्य प्रदेशच्या इंदोरमधील सोनम आणि तिचा पती राजा रघुवंशी हे २२ मे रोजी शिलाँगमधून अचानक बेपत्ता झाले होते. त्यानंतर २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह आढळून आला होता. मात्र, तेव्हापासून सोनम रघुवंशी ही बेपत्ता झाली होती. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. यानंतर ९ जूनला गाझिपूरमध्ये सोनम एका ढाब्यावर आढळून आली आणि पोलिसांनी तिला अटक केलं. या प्रकरणात आता आणखी चार जणांना अटक करण्यात आलं असून दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
राजा रघुवंशीची हत्या प्रकरणात सोनमचा सहभाग असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. तसेच या प्रकरणात २१ वर्षीय राज कुशवाह हा तरुण या घटनेतील मुख्य आरोपी असल्याचा संशय पोलिसांना असून त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. मात्र, आता राजाचा मोठा भाऊ विपिन रघुवंशी यांनी एक मोठा दावा केला आहे. सोनमचं लग्न राजाशी लावल्यास त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, असा इशारा सोनमने तिच्या कुटुंबाला दिला होता असा दावा राजाच्या मोठ्या भावाने केला आहे.
तसेच सोनमच्या प्रेमसंबंधाबाबत देखील तिच्या कुटुंबाला माहिती होतं, असाही दावा विपिन रघुवंशी यांनी केला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे. वृत्तानुसार, विपिन रघुवंशी यांनी म्हटलं की, “सोनमने तिच्या आईला राज कुशवाहबरोबर असलेल्या तिच्या प्रेम संबंधांबद्दल सांगितलं होतं. पण सोनमच्या कुटुंबाने त्यांचं हे नातं स्वीकारण्यास नकार दिला आणि तिचा विवाह आपल्याच समुदायात झाला पाहिजे असा आग्रह धरला होता”, असा आरोप विपिन रघुवंशी यांनी केला आहे.
“सोनमच्या कुटुंबातील एका व्यक्तीने मला सांगितलं की सोनमने तिच्या आईला सांगितलं होतं की तिचे दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे. पण तिच्या कुटुंबाने तिला सांगितलं होतं की, तू कोणावरही प्रेम करू शकतेस. पण तुझे लग्न आपल्या समाजातच होईल. त्यावर सोनमने इशारा दिला होता की, ठीक आहे, मी कुठेही लग्न करेन. पण नंतर काहीही झालं तर मी त्याची जबाबदारी घेणार नाही”, असा इशारा सोनमने तिच्या कुटुंबाला दिला होता, असा आरोप विपिन रघुवंशी यांनी केला आहे.
राजा रघुवंशीच्या आईने काय म्हटलं आहे?
सोनम माझ्या मुलाची हत्या म्हणजेच राजाची हत्या करेल हे आम्हाला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण आता ज्या गोष्टी समोर येत आहेत त्यावरुन असंच वाटतं आहे तीच या सगळ्यात सामील आहे. राजाच्या फोटोला हार घालण्यात आला आहे. हा फोटो जवळ घेऊन त्याची आई म्हणाली, सोनमला दुसरा मुलगा आवडत होता तर मग तिने राजाशी लग्न करण्यास नकार का दिला नाही? तिने माझ्या मुलाची हत्या का केली? तर राजाच्या वडिलांनी म्हटलं आहे की ज्यांनी माझ्या मुलाला ठार केलं त्यांना फाशी द्या. माझ्या मुलाला तडफडत ठेवलं आणि मारण्यात आलं आहे. यापुढे अशा घटना होऊ नयेत म्हणून सगळ्या आरोपींना फाशी द्या. अशी मागणी राजाच्या वडिलांनी केली आहे.