जनतेची दिशाभूल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आपल्याच पोकळ कार्यक्रमांचा उदोउदो करीत असल्याची टीका बसपच्या अध्यक्षा मायावती यांनी शनिवारी केली. भाजप सरकारचे वाईट दिवस येत चालले असल्याचेही त्या म्हणाल्या.
मायावती यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बातचित करताना उत्तर प्रदेश सरकारवरही टीका केली. बुंदेलखंडचा दौरा करण्याऐवजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मथुराला भेट द्यावयास हवी होती, असे सांगून मायावती यांनी, मथुरातील हिंसाचाराची सीबीआय, न्यायिक अथवा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करावी, अशी मागणी केली. मोदी सरकारने दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका कार्यक्रम केला त्यावर टीका करताना मायावती म्हणाल्या की, श्रेय घ्यावे असे भाजप सरकारने काहीही केलेले नाही, त्यामुळे केवळ पोकळ कार्यक्रमांचा उदोउदो करून जनतेची दिशाभूल करण्यातच ते धन्यता मानत आहेत, असेही मायावती म्हणाल्या.