scorecardresearch

“कदाचित माझ्या मुलाच्या ‘त्या’ इच्छेसाठी मी सैन्य माघारी घेण्याचा निर्णय घेतला असावा”; बायडेन यांचं भावनिक वक्तव्य

अफगाणिस्तानमधील लष्कर माघारी बोलवण्याच्या निर्णयावर बोलताना बायडेन यांना त्यांच्या दिवंगत मुलाची म्हणजेच ब्यू बायडेन याची आठवण झाली.

Beau Joe Biden
अफगाणिस्तानमधून सैन्य माघार ही योग्य असल्याचा युक्तीवाद बायडेन यांनी केला. (प्रातिनिधिक फोटो सौजन्य रॉयटर्स आणि सोशल नेटवर्किंगवरुन साभार)

अफगाणिस्तानमधून अमेरिकन लष्कराला माघारी बोलवल्यानंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी बुधवारी पहिल्यांदाच देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी अमेरिकेची अफगाणिस्तानमधील ही लढाई यशस्वी ठरल्याचं म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी दहशतवादाविरोधातील लढाई सुरु राहील असा उल्लेखही केलाय. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी, “मला विश्वास आहे ही अफगाणिस्तानमधून अमेरिकन लष्कराला माघारी बोलवण्याचा निर्णय हा सर्वात योग्य, विचारपूर्व आणि सर्वोत्तम आहे,” असंही म्हटलं आहे.

अफगाणिस्तानमधील लष्कर माघारी बोलवण्याच्या निर्णयावर बोलताना बायडेन यांना त्यांच्या दिवंगत मुलाची म्हणजेच ब्यू बायडेन याची आठवण झाली. ब्यू बायडेनच्या एका इच्छेचा उल्लेख करत यामुळेही कदाचित आपण अमेरिकन लष्कराला माघारी बोलवण्याचा निर्णय घेतला असावा असा उल्लेख बायडेन यांनी केला. ब्यू बायडेन हा अमेरिकन लष्करामध्ये होता आणि त्याने इराकमध्ये एक वर्ष लष्करी सेवा केली होती. २०१५ मध्ये ब्रेन कॅन्सरमुळे वयाच्या ४६ व्या वर्षी ब्यूचं निधन झालं. बायडन यांना बोलता बोलता ब्यूची आठवण झाली. “आपल्या देशातील एक टक्का लोक हे लष्करामध्ये आहेत. मात्र आपल्यापैकी अनेकांना देश म्हणून आपण त्यांच्याकडून किती अपेक्षा ठेवतोय याचा अंदाज नसावा. आपल्या देशाच्या संरक्षणासाठी ते त्यांचे प्रमाण पणाला लावतात. देशाच्या संरक्षणासाठी माझा मुलगाही गेला होता. ब्यूने मृत्यूपूर्वी पूर्ण एक वर्ष इराकमध्ये लष्करामध्ये सेवा दिली. त्याला युद्ध थांबवायचं होतं. कदाचित मी माझ्या मुलाच्या या इच्छेसाठीही अफगाणिस्तानमधील युद्ध थांबवण्याचा निर्णय घेतला असावा,” असं बायडेन म्हणाले. एक सिनेटर, एक उपराष्ट्राध्यक्ष आणि राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकन लष्कराने वेगवेगळ्या देशांमध्ये केलेला संघर्ष मी पाहिलाय, असंही बायडेन यावेळी म्हणाले. बायडेन यांनी यापूर्वीही अफगाणिस्तानमधील लष्करच त्यांच्या देशासाठी लढण्यास तयार नसले तर आपल्या तरुणांच्या किती पिढ्या आपण लष्कर म्हणून अफगाणिस्तानात पाठवायच्या? असा प्रश्न उपस्थित केलेला.

नक्की वाचा >> तालिबानचं अभिनंदन करताना ‘अल-कायदा’ने केला काश्मीरचा उल्लेख; म्हटलं, “इतर इस्लामिक प्रदेशही…”

तालिबानसोबत अमेरिकेने केलेल्या करारासाठी बायडेन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवलं. “जेव्हा ते पदावर होते तेव्हा तालिबान २००१ नंतर त्यांच्या सर्वात मजबूत परिस्थितीमध्ये होतं. देशाचा अर्ध्याहून अधिक भागावर तालिबानचं नियंत्रण होतं. मागील प्रशासनाचे करार करताना अमेरिका १ मे रोजी माघार घेण्यासंदर्भात काम करत असल्याचा उल्लेख असून असं केल्यास तालिबान कोणत्याही अमेरिकन तुकडीवर हल्ला करणार नाही असं ठरवण्यात आलेलं. या करारावर ट्रम्प यांच्या सह्या आहेत. मात्र अमेरिकेने असं केलं नाही तर तालिबान शक्य ते सर्व मार्ग वापरुन अमेरिकेला विरोध करणार असं निश्चित होतं,” असा दावा बायडेन यांनी भाषणात केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-09-2021 at 09:28 IST

संबंधित बातम्या