श्रीनगर : भाजपने निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेचा ऱ्हास केल्याचा आरोप शनिवारी पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी केला. आयोग आता स्वायत्त स्वतंत्र संस्था उरला नसल्याची टीका त्यांनी केली.

मेहबुबा मुफ्ती यांनी अनंतनाग जिल्ह्यातील खिरम भागात पत्रकारांशी बोलताना सांगितले, की हिमाचल प्रदेशात भाजप नेतृत्वाने धार्मिक आधारावर निवडणुकीचा प्रचार केला. मुस्लिमांना उघड धमक्या दिल्या जात आहेत. पण निवडणूक आयोग मूक प्रेक्षक बनला आहे. भाजपची संमती मिळाल्यानंतरच जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक होईल. प्रशासनाच्या मुद्दय़ावर मेहबुबा यांनी सांगितले, की सध्याचे सरकार सर्व निर्णय उलट फिरवत आहे. आमच्या काश्मिरी पंडितांकडे पहा. ते अनेक महिन्यांपासून जम्मूत छावण्यांत आहेत. ते काश्मीरमधील परिस्थिती सुधारेपर्यंत त्यांना जम्मूमध्ये स्थायिक करण्याची मागणी करत आहेत. पण सरकार कधी त्यांचे वेतन रोखत आहे, तर कधी त्यांना स्वस्त धान्यपुरवठा (रेशन) करणे थांबवत आहे. भाजप केवळ मते मिळविण्यासाठी काश्मिरी पंडितांच्या वेदनांचा वापर करत आहे.

‘विस्तारीत शाखा!’
मेहबुबा म्हणाल्या, की निवडणूक आयोग ही भाजपचीच विस्तारीत शाखा झाली आहे. भाजप जे सांगेल ते आयोग करत आहे. कधी काळी आमच्या निवडणूक आयुक्तांना इतर देशांकडून सल्ला घेण्यासाठी आमंत्रित केले जात होते. देशासाठी ही अभिमानास्पद बाब होती.