Crime News in Patna : मुझफ्फरपूरहून पाटणा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल येथे जाण्यास सांगितलेल्या एका अल्पवयीन बलात्कार पीडितेला शनिवारी चार तासांहून अधिक काळ रुग्णवाहिकेतच वाट पाहावी लागली. रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने तिला बाहेर ताटकळत ठेवण्यात आलं होतं, टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे जागतिक दर्जाची सुविधा पुरवणाऱ्या पीएमसीएचसारख्या रुग्णालयाच्या सुविधेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आगे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश राम हे मिडिया सेलचे अध्यक्ष राजेश राठोरे यांच्याबरोबर रुग्णालयात गेले होते. त्यांनी सांगितलं की, आरोग्यमंत्री मंगल पांडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांनी उत्तर दिलं नाही.
राठोरे म्हणाले, पीडितेला मुझफ्फरपूरमधील एसकेएमसीए येथून या रुग्णालयात पाठवण्यात आले होते. ती सकाळी ११ वाजता पीएमसीएचमध्ये पोहोचली. परंतु, तिला बेड उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालय प्रशासनाला चार तासांपेक्षा जास्त वेळ लागला आणि अखेर दुपारी ३ नंतर तिला तेथे दाखल करण्यात आले.
अधीक्षक रजेवर असून माहिती मिळताच मी बलात्कार पीडितेकडे धाव घेतली, असं पीएमसीएचचे उपअधीक्षक डॉ. अशोक कुमार झा म्हणाले. बलात्कार पीडिता रुग्णवाहिकेत असल्याचं समजताच डॉक्टरांनी तिला रुग्णवाहिकेतच तपासलं, असं ते म्हणाले.
२६ मे रोजी मुलीवर बलात्कार झाला होता. मारहाणीनंतर आरोपीने तिच्या गळा आणि छातीवर हल्ला केला. पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, गुन्हेगाराने तिला तिच्या मावशीच्या घराजवळ चॉकलेट देण्याच्या बहाण्याने तिला पळवून मक्याच्या शेतात नेले होते. तिच्यावर हल्ला झाल्याने तिच्या स्वरयंत्रांना नुकसान झालं आहे. या प्रकरणी आरोपी रोहित साहनी (३०) याला अटक करण्यात आली आहे.