पीटीआय, हजारीबाग (झारखंड)
पाकिस्तान व बांगलादेश यांना लागून असलेल्या भारताच्या दोन प्रमुख सीमांवर सुमारे ६० किलोमीटरच्या पट्टय़ांमधील रिकाम्या जागा भरून काढण्याचे काम सुरू असल्यामुळे, येत्या दोन वर्षांमध्ये या सीमा संपूर्णपणे सुरक्षित केल्या जातील असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी सांगितले.सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) स्थापना दिवस समारंभानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या औपचारिक परेडमध्ये मानवंदना स्वीकारल्यानंतर शहा बोलत होते.
केंद्रात सत्तेवर आल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षांमध्ये भारत- पाकिस्तान व भारत- बांगलादेश सीमांवरील सुमारे ५६० किलोमीटरच्या रिकाम्या जागा भरून काढल्या असून या सीमांवर कुंपण घातले आहे. यापूर्वी या फटींचा वापर घुसखोरी व तस्करीसाठी केला जात होता, असे शहा म्हणाले. देशाच्या पश्चिम व पूर्व दिशांना या दोन सीमांवरील सर्व रिकाम्या जागा भरून काढण्यात येत असून केवळ ६० किलोमीटरचे काम बाकी आहे. येत्या दोन वर्षांमध्ये आम्ही या दोन्ही सीमा संपूर्णपणे सुरक्षित करू, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचा >>>भारतीय विद्यार्थ्याला अमेरिकेत सात महिने डांबून ठेवलं, मार-मार मारलं अन्…, पोलिसांनी दिली अमानवीय कृत्यांची माहिती
२२९० किलोमीटरची भारत- पाकिस्तान सीमा आणि ४०९६ किलोमीटरची भारत- बांगलादेश सीमा या दोन्ही सीमांवर नद्या, पर्वतीय आणि दलदलीचे भाग असून तेथे कुंपण उभारणे अतिशय कठीण आहे. त्यामुळे बीएसएफ व इतर यंत्रणा घुसखोरी रोखण्यासाठी तांत्रिक उपकरणांचा वापर करत असतात.
‘देशातून नक्षलवादाचे निर्मूलन लवकरच’
भारत नक्षलवादाचे निर्मूलन करण्याच्या बेतात असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. नरेंद्र मोदी सरकारने हा लढा जिंकण्याचा निर्धार केला असल्याचेही ते म्हणाले. गेल्या दहा वर्षांत नक्षल हिंसाचाराच्या घटना ५२ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. या घटनांमधील मृत्यूंचे प्रमाण ७० टक्क्यांनी घसरले आहे, तर नक्षलवादग्रस्त जिल्ह्यांची संख्या ९६ वरून ४५ वर आली आहे असे त्यांनी सांगितले.