M.K Bhatia Gift 51 Luxury Cars To Employees For Diwali: चंदीगडमधील एम. के. भाटिया या उद्योजकाने दिवाळी भेट म्हणून त्यांच्या कर्मचाऱ्यांना ५१ नवीन आलिशान कार भेट दिल्या आहेत. पंचकुला येथील मिट्स हेल्थकेअरचे संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते एम. के. भाटिया यांनी नुकतेच त्यांच्या सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारच्या चाव्या सुपूर्द केल्या.
सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त आलिशान कार भेट देण्याचे भाटिया यांचे हे तिसरे वर्ष आहे. लिंक्डइनवरील एका पोस्टमध्ये भाटिया यांनी लिहिले, “गेल्या दोन वर्षांपासून, आम्ही आमच्या सर्वोत्तम कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त कार भेट देऊन त्यांचा सन्मान करतो. या वर्षीही ही परंपरा कायम ठेवली आहे.”
“मी त्यांना कधीही कर्मचारी म्हणून वागवले नाही. ते माझ्या जीवनातील रॉकस्टार सेलिब्रिटी आहेत. आमच्या प्रवासातील प्रत्येक क्षणाला ब्लॉकबस्टर बनवणारे तारे आहेत. काही कर्मचाऱ्यांना आधीच कारच्या चाव्या दिल्या आहेत. आणखी काही कार लवकरच येणार आहेत. ही दिवाळी खूप खास असणार आहे!”, असे म्हणत भाटिया यांनी कर्मचाऱ्यांना कारच्या चाव्या देतानाचे फोटो शेअर केले आहेत.
पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, भाटिया यांनी या आठवड्यात काही कर्मचाऱ्यांना या आलिशान कार सुपूर्द केल्या आहेत. त्यानंतर शोरूमपासून कंपनीच्या मिट्स हाऊस ऑफिसपर्यंत “कार गिफ्ट रॅली” काढण्यात आली होती.
दरवर्षी इतक्या महागड्या भेटवस्तू का देता, असे विचारले असता भाटिया म्हणाले, “माझे सहकारी माझ्या औषध कंपन्यांचा कणा आहेत. त्यांचे कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि समर्पण हे आमच्या यशाचा पाया आहे. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देणे आणि एका वेगळ्या उंचीवर नेणे हे माझे एकमेव ध्येय आहे.”
सोशल मीडियावर भाटिया यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त कार भेट दिल्याचे वृत्त मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक युजर्सनी त्यांच्या उदारतेचे कौतुक केले आहे. “मी हे माझ्या मॅनेजरला दाखवले. तेव्हा ते म्हणाले, हा एआय जनरेट केलेला व्हिडिओ आहे. दरम्यान, माझ्या कंपनीने दिवाळीसाठी ड्रायफ्रूटचा एक छोटासा बॉक्स, एक जार आणि ४ दिवे दिले आहेत”, असे एका युजरने म्हटले.
दुसऱ्या एका युजरने लिहिले, “एम. के. भाटियाजी, आजच्या काळात तुमच्यासारखा माणूस पाहायला मिळणे दुर्मिळ आहे. तुमचं वागणं केवळ कौतुकास्पद नाही, तर ते देवाची देणगी आहे. तुमच्याबद्दल आम्ही जे ऐकले त्यावरून तुम्ही खूप चांगले काम करत आहात. आम्ही देवाला प्रार्थना करतो की तुम्हाला खूप आनंद आणि यश लाभो.”