scorecardresearch

अमित शाहांच्या दौऱ्यापूर्वी जम्मूत इंटरनेट सेवा स्थगित, बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येनंतर निर्णय

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जम्मू दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जम्मूसह राजौरीच्या काही भागांमध्ये मोबाइल इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे.

अमित शाहांच्या दौऱ्यापूर्वी जम्मूत इंटरनेट सेवा स्थगित, बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येनंतर निर्णय
जम्मूमध्ये इंटरनेट सेवा स्थगित! (संग्रहित फोटो)

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज जम्मू दौऱ्यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जम्मूसह राजौरीच्या काही भागांमध्ये मोबाइल इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे. राजौरी जिल्ह्यात सोमवारी रात्री एका उच्च पोलीस अधिकाऱ्याची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी जम्मूसह राजौरी जिल्ह्यात मोबाईल इंटरनेट सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज सायंकाळी सात वाजेपर्यंत या परिसरात इंटरनेट सेवा स्थगित असेल.

सोमवारी सायंकाळी उशिरा अमित शाह जम्मूमध्ये दाखल झाले आहेत. त्याच दिवशी रात्री जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या तुरुंगांचे प्रभारी पोलीस महासंचालक (डीजीपी) हेमंत लोहिया यांची हत्या करण्यात आली आहे. लोहिया यांच्या घरी घरकाम करणाऱ्या व्यक्तीनेच ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध आढळला नाही.

हेही वाचा“गृहमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी छोटीशी भेट”; जम्मू कारागृह महासंचालकांच्या हत्येनंतर दहशतवादी संघटनेचा इशारा

असं असलं तरी गेल्या आठवडाभरात जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले झाले आहेत. अमित शाह उद्या (बुधवारी) श्रीनगरमध्ये सुरक्षा आढावा बैठक घेणार आहेत. तत्पूर्वी ते आज जम्मू प्रदेशातील राजौरी जिल्ह्यात एक जाहीर सभा घेणार आहेत. या सभेतून ते जम्मू काश्मीरमधील पहारी समुदायाला अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा देण्याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे. यानंतर उद्या ते उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला शहरात दुसरी जाहीरसभा घेणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या