‘वंदे मातरम्’ची महत्त्वाची कडवी १९३७ मध्ये गाळली गेली होती, त्यामुळे देशात फाळणीची बीजे रोवली गेली, असा दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी काँग्रेसवर टीका केली. अशा प्रकारची विभाजनवादी मानसिकता अजूनही देशासमोरील आव्हान आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
स्वातंत्र्यचळवळीत स्वातंत्र्य सैनिकांचे महत्त्वाचे स्फूर्तीगीत असलेल्या ‘वंदे मातरम्’ला शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने दिल्लीतील ‘इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम’मध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये वर्षभराच्या सोहळ्याला सुरुवात झाली. त्याचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी एका विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन केले.
राष्ट्रउभारणी करणाऱ्या ‘वंदे मातरम्’बरोबर अन्याय झाला आहे आणि आताच्या पिढीला हा अन्याय कळलाच पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यापूर्वी जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने धर्मांध अजेंडा राबवल्याचा आरोप भाजपने केला.
‘वंदे मातरम्’ हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा आवाज झाले होते, त्याद्वारे प्रत्येक भारतीयाच्या भावना व्यक्त झाल्या होत्या. दुर्दैवाने १९३७मध्ये ‘वंदे मातरम्’ची महत्त्वाची कडवी गाळली गेली. त्याच्या (‘वंदे मातरम्’) आत्म्याचे अंशत: विच्छेदन केले गेले. ‘वंदे मातरम्’च्या विभागणीमुळे फाळणीचीही बीजे रोवली गेली. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
गीताचा इतिहास
देशाच्या संविधान सभेने २४ जानेवारी १९५० रोजी ‘वंदे मातरम्’ला अधिकृतपणे राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला. ‘वंदे मातरम्’ गीतात एकूण सहा कडवी आहेत. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, मौलाना अबुल कलाम आझाद, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आचार्य नरेंद्र देव यांच्या समितीने शिफारस केल्यानंतर, काँग्रेसने १९३७ मध्ये ‘वंदे मातरम्’ची पहिली दोन कडवी राखून त्याची राष्ट्रीय गीत म्हणून निवड केली होती.
काँग्रेस स्वाभिमानी ध्वजवाहक : खरगे
कलकत्ता येथे १८९६मध्ये आयोजित काँग्रेस अधिवेशनात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम ‘वंदे मातरम्’ गीत सार्वजनिक व्यासपीठावर गायले होते, तेव्हापासून काँग्रेसने या गीताची ध्वजा वाहिली आहे, असे स्मरण पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी केले. मात्र राष्ट्रवादाचे स्वयंघोषित रक्षक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने कधीही त्यांच्या शाखांमध्ये किंवा कार्यालयांमध्ये ‘वंदे मातरम्’ किंवा ‘जन गण मन’ गायले नाही, अशी टीका खरगे यांनी केली. ‘‘बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या या गीतामध्ये देशाचे ऐक्य आणि विविधतेची प्रशंसा केली आहे. १९०५मधील बंगालच्या फाळणीपासून शूर क्रांतिकारकांच्या अखेरच्या श्वासापर्यंत वंदे मातरम् देशभरात गुंजत राहिले,’’ असे खरगे यांनी प्रसृत केलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
‘वंदे मातरम्’च्या पूर्ण आवृत्तीचे गायन लवकरच : शहा
नवी दिल्ली : ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्षाच्या उत्सवाचा भाग म्हणून देशभरात त्याची पूर्ण आवृत्ती गायली जाईल. राष्ट्रीय एकता आणि सांस्कृतिक जागृतीसाठी हे कालातीत आवाहन आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. ‘वंदे मातरम्’ हे स्वातंत्र्याचे गाणे, अढळ संकल्पाची भावना आणि भारताच्या जागृतीचा पहिला मंत्र आहे. ‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षपूर्तीनिमित्त केंद्र सरकारने ७ नोव्हेंबरपासून वर्षभरासाठी देशव्यापी कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे ‘वंदे मातरम्’ची संपूर्ण आवृत्ती पुन्हा देशभरात गुंजेल, तरुणांना सांस्कृतिक राष्ट्रवाद ही संकल्पना आत्मसात करण्यास प्रेरणा मिळेल, असे शहा यांनी म्हटले आहे.
मुंबईत भाजप- काँग्रेसमध्ये वाद
मुंबई : ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपने विविध ठिकाणी या गीताच्या गायनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्रमावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू झाला आहे. केवळ मुस्लिम आमदारांना लक्ष्य करून ‘वंदे मातरम्’ नावाने वाद निर्माण केला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला. ५२ वर्षे पक्षाच्या कार्यालयावर तिरंगा न फडकावणारे हेच आता राष्ट्रप्रेमाचा दिखावा करत असल्याचा आरोप काँग्रेसनेे केला.
