मॉस्को : रशियाचे भारतासोबत असलेले संबंध हे खास असल्याचे सांगत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. ‘आपल्या देशाच्या भल्यासाठी पंतप्रधान मोदी हे स्वतंत्र परराष्ट्र धोरण राबवत आहेत,’ असे पुतिन म्हणाले. येथील वैचारिक संघटना ‘वाल्डिया इंटरनॅशनल डिस्कशन क्लब’च्या बैठकीत ते बोलत होते.
लष्करी आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारतासोबत सहकार्य सुरूच असल्याचे सांगून पुतिन म्हणाले की, भारत आणि रशियामध्ये अनेक दशकांपासून विशेष संबंध आहेत. भारतासोबत आमचा कोणत्याही मुद्दय़ावर कधीच वाद नव्हता. आम्ही नेहमीच एकमेकांना साथ देत आलो आहोत आणि भविष्यातही हे असेच राहील याबाबत मी आशावादी आहे.’ भारतासारख्या देशांना उज्ज्वल भवितव्यच आहे असे नव्हे, तर त्यांचे जागतिक महत्त्व वाढत जाणार आहे, अशी पुष्टीही पुतिन यांनी जोडली.
जगभरात भारताकडे सन्मानाने बघितले जाते. ही खऱ्या अर्थाने सर्वात मोठी लोकशाही आहे. चांगल्या विकासदराचा त्या देशाला अभिमान असायला हवा.
– व्लादिमीर पुतिन