नवी दिल्ली: कठोर प्रहार झाला तेव्हा पाकिस्तानने फोन करून डीजीएमओला सांगितले की, खूप मारले, आता आणखी मार खाण्याची ताकद नाही. देशाच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानविरोधात केलेली कारवाई रोखण्यासाठी कोणत्याही देशाने सांगितले नाही. ऑपरेशन सिंदूरला तमाम देशांनी पाठिंबा दिला मात्र, काँग्रेसचा पाठिंबा मिळाला नाही. त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशावर सातत्याने प्रश्न विचारले.
इतकेच नव्हे तर पाकिस्तानला निर्दोषत्व दिले. पण, पाकिस्तानला भारताच्या भविष्याशी खेळू देणार नाही. म्हणूनच ऑपरेशन सिंदूर सुरु राहील. हा पाकिस्तानसाठी देखील इशारा आहे. भारताचा रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पुन्हा कारवाई करून अद्दल घडवू, असा घणाघाती प्रहार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत केला.
सुमारे दोन तासांच्या भाषणामध्ये मोदींनी ऑपरेशन सिंदूर संदर्भात काँग्रेस व इंडिया आघाडीतील विरोधी पक्षांनी घेतलेल्या अनेक आक्षेपांना प्रत्युत्तर दिले. मोदींनी प्रामुख्याने काँग्रेसला लक्ष्य केले. काँग्रेसला आता केंद्र सरकारविरोधात पाकिस्तानकडून राजकीय मुद्दे आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे, अशी टीका मोदींनी केली. काँग्रेसच्या बरोबरीनेच मोदींनी पाकिस्तानने ऑपरशन सिंदूरमध्ये कसे गुडघे टेकले आणि शस्त्रसंधीसाठी गयावया केली याचेही वर्णन केले. दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्याचे लक्ष्य गाठल्यानंतर ऑपरेशन सिंदूरला विराम दिला गेला असे मोदी म्हणाले.
पहलगामनंतर पाकिस्तानी सैन्याला कळले होते की, भारत मोठी कारवाई करेल. त्यांच्याकडून अणुबॉम्बच्या धमक्या दिल्या गेल्या. या धमक्यांना न घाबरता पाकिस्तानच्या कोपऱ्या कोपऱ्यात जाऊन दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले. भारताने सिध्द केले की, अणुबॉम्बचे दबावतंत्र चालणार नाही. या हल्ल्यातून भारताने तांत्रिक क्षमताही सिद्ध केली. भारताच्या संरक्षण दलांची एकत्रित कारवाई पाहून पाकिस्तान घाबरून गेला. र्पू्वीही कारवाई होत होती पण, हल्ल्यांचे सूत्रधार निर्धास्त असत. पुढच्या कारवाईची तयारी करत. आता त्यांना हल्ल्यानंतर झोप लागत नाही. त्यांना माहीत आहे की, भारत येऊन त्यांना मारून जाईल. हे न्यू नॉर्मल आहे, असे मोदी म्हणाले.
सिंधपासून सिंधूपर्यंत सगळीकडे पाकिस्तावर कारवाई केली. दहशतवाद्यांचे आका भयग्रस्त झाले. दहशतवादी हल्ल्यांची आकांना मोठी किंमत चुकवावी लागेल. त्यांना मोकळे सोडले जाणार नाही. भारतावर हल्ला झाला तर आम्ही आमच्या पद्धतीने, आमच्या शर्तींवर, आम्ही ठरवू तेव्हा प्रत्युत्तर देऊ. अणूबॉम्बची धमकी चालवून घेणार नाही. दहशतवाद्यांना पाठिंबा देणारे सरकार आणि आका यांना आम्ही वेगळे मानत नाही. पाकिस्तानकडे सामंजस्य असते तर ते दहशतवाद्यांच्या पाठिशी उभे राहिले नसते. पण, निर्लज्जपणे ते उभे राहिले.
पाकिस्तानने मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला, तेव्हा आमल्या सैन्याने वर्षानुवर्षे लक्षात राहील असे प्रत्युत्तर दिले. ९ मे च्या रात्री क्षेपणास्त्रांचा मारा करून प्रचंड प्रहार केला. एवढा कठोर प्रहार झाला तेव्हा पाकिस्तानने फोन करून डीजीएमओला सांगितले की, खूप मारले, आता आणखी मार खाण्याची ताकद नाही. आम्हाला सोडा… भारताने ७ मे रोजीच सांगितले होते की, लक्ष्य गाठले. आमची कुरापत काढली तर महागात पडेल असे ठणकावून सांगितले गेले. आणि मगच, भारताने शस्त्रसंधी केला, असा दावा मोदींनी केला.
संरक्षणक्षेत्रातील मेक इन इंडिया धोरणामुळेच ऑपरेशन सिंदूर यशस्वी होऊ शकले. काँग्रेसने कधीही संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचा विचार केला नव्हता. गेल्या दहा वर्षांमध्ये आम्ही हा विचार केला नसता तर, आत्मनिर्भर झालो नसतो तर ऑपरेशन सिंदूर राबवण्याचा विचार देखील करता आला नसता. तंत्रज्ञानाधारित युद्धातही आपण यशस्वी ठरलो हेच ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिले. सिंदूरदरम्यान पहिल्यांदाच भारताची संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता जगाला दिसली, असे मोदी म्हणाले.
ऑपरेशन सिंदूर म्हणजे सैन्याचे शौर्य व सामर्थ्याचा विजयोत्सव आहे. हे ज्यांना दिसत नाही त्यांना मी आरसा दाखवण्यासाठी उभा आहे, असे म्हणत मोदींनी काँग्रेसची खिल्ली उडवली. जवानांच्या शौर्याला काँग्रेसचा पाठिंबा मिळाला नाही. कुठे आहे ५६ इंची छाती. मोदी फोल ठरले, असा प्रचार केला. त्यांना वाटते की, बाजी मारली. पहलगाममधील हल्ल्यामध्ये काँग्रेसला राजकीय लाभ दिसला. त्यांचा भारताच्या सैन्यावरही विश्वास नाही असा टोला पंतप्रधानांनी लगावला.
ऑपरेशन सिंदूर सैन्याने शतप्रतिशत यशस्वी केले. पण, त्यावरही काँग्रेसने विश्वास ठेवला नाही. काँग्रेसला पाकिस्तानचे मुद्दे आयात करावे लागत आहेत. बालाकोटमध्ये हवाई हल्ले केले. त्यावेळी छायाचित्रे मागितली. इतकेच नव्हे तर, वैमानिक अभिनंदन पकडले गेले तेव्हा पाकिस्तानमध्ये आनंदाचे वातावण साहाजिकच होते. इथेही लोक होते ते आता मोदी फसले. आता बघू मोदी काय करणार… पण, आम्ही अभिनंदनला परत आणले. पहलगाम हल्ल्यानंतर बीएसएफचा जवान पकडला गेला. मोदींची फजिती होईल असे वाटले होते. या जवानाचे, कुटुंबाचे काय होणार, कधी येणार असे प्रश्न विचारले गेले. हा जवानही सहीसलामत परत आला. दहशतवाद्यांचे आका रडत आहेत, त्यांना रडताना बघू इथेही लोक (काँग्रेस) रडत आहेत.
पूर्वीपासून काँग्रेसचा सैन्याचा विरोध, सैन्याविषयी निकारात्मक विचार राहिलेला आहे. कारगील युद्धाला विजयी मानत नाहीत. विजयोत्सव साजरा केला जात नाही. डोकलाममध्ये सैन्य शौर्य दाखवत होता तेव्हा काँग्रेसनेते कुणाला (चीन) भेटत होते आम्हाला माहीत आहे. काँग्रेस पाकिस्तानच्या सुरात सूर मिळवत आहेत अशी चौफेर टीका मोदींनी केली.
ट्रम्प यांची मध्यस्थी फेटाळली
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याचा आरोप मोदींनी अप्रत्यक्ष फेटाळला. ९ मे रोजी रात्री अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्षांचा फोन आला होता. सैन्याशी बैठक सुरू होती. मी त्यांना नंतर फोन केला. त्यांनी सांगितले की, पाकिस्तान तुमच्यावर हल्ला करणार आहे. त्यांना मी सांगितले की, मला माहीत आहे. पाकिस्तानने हल्ला केला तर त्याला हा हल्ला महागात पडेल. त्यापेक्षा मोठा हल्ला करून प्रत्युत्तर देऊ. गोळीचे प्रत्युत्तर तोफा डागून दिले जाईल… ९ मे रात्री पाकिस्तावर सैन्य तळे नष्ट केले.
नेहरुंच्या निर्णयांचा फटका
नेहरूंनी स्वातंत्र्यानंतर जे निर्णय घेतले गेले, त्याची शिक्षा देश आजतगायत भोगत आहे. अक्साई चीनला पडिक जमीन ठरवले गेले. १९६२ व ६३ दरम्यान काँग्रेसचे नेते पुंछ, उरी, नीलम खोरे सोडून देण्याचा विचार करत होते. कच्छच्या रणामधील जामीन देण्याचा विचार होता. हजारो चौरस मीटर जमीन ताब्यात होती. आपण खूप काही करू शकलो असतो, दूरदृष्टी असती तर पाकव्याप्त काश्मीर परत घेतले असते, पण, संधी सोडून दिली. निदान करतारपूर साहब तरी ताब्यात घ्यायचे होते. १९७४ श्रीलंकेला बेट देऊन टाकले. सियाचीनमधून सैन्य मागे घेण्याचा काँग्रेसचा विचार होता, पण, त्यांना संधी मिळाली नाही. नाही तर सियाचीनही आपल्याकडे राहिले नसते, असा प्रहार मोदींनी केला.
काँग्रेसचे नेते राजनैतिक मुत्सद्दीगिरी शिकवत आहेत, त्यांना आठवण करून देतो की, २६ नोव्हेंबरला मुंबईत हल्ला झाला त्यानंतर पाकविरोधात कारवाई करण्याऐवजी विदेशी दबावाखाली पाकिस्तानशी चर्चा सुरू केली. काँग्रेस सरकारने पाकच्या दुतावासातील अधिकाऱ्यांना भारतातून बाहेर काढले नाही. पाकस्तानी पुरस्कृत हल्ले होत राहिले, पाकिस्तानला मोस्ट फेव्हर्ड राष्ट्रांचा दर्जा दिला. मुंबईच्या हल्ल्याचा देश न्याय मागत होता पण, काँग्रेस पाकिस्तानशी व्यापार करत होता. पाक रक्ताची होळी खेळत होता, दहशतवाद्यांना पाठवत होता, काँग्रेस ह्यअमन की आसह्ण वर मुशायरा होत होते. हे प्रकार आम्ही बंद केले. आम्ही व्हिसा बंद केला.
सिंधू जलकरारावरून टीकास्त्र
सिंधू जलकरारावरून मोदींनी नेहरू व काँग्रेसवर सडकून टीका केली. हा करार नेहरूंनी केला. आमच्या नद्यांचे पाणी पाकिस्तानला दिले. नेहरूंनी ८० टक्के पाणी पाकिस्तानला दिले. पण, भारताला फक्त २० टक्के ठेवले, ही कसली मुत्सद्देगिरी होती? नेहरू फक्त तत्कालिक प्रभाव पाहात होते, पाकशी असलेले इतर प्रश्न सुटतील असे वाटत होते पण, तसे झाले नाही, हे नेहरूंनी मान्य केले. या करारामुळे देशाची मोठी हानी झाली. सिंधू करार आम्ही देशहितासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी रद्द केला. हा करार असाच पुढे चालू राहू दिला जाणार नाही. रक्त आणि पाणी एकाचवेळा एकत्र वाहू शकणार नाही, असा पुनरुच्चार मोदींनी केला.
देशात २०१४च्या आधी असुरक्षेचे वातावण देशात होते. दहशतवाद रोखता येतो हे आम्ही ११ वर्षांत दाखवून दिले. दहशतवाद वाढला कारण काँग्रेसने तुष्टीकरणाचे राजकारण केले. दिल्लीत बाटला हाऊसमध्ये दहशतवादी मारले गेले तेव्हा काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या डोळ्यात अश्रू आले. संसदेवर हल्ल्यातील दोषी अफजल गुरुला वाचवण्याचे प्रयत्न काँग्रेसने केले. मुंबई हल्ल्यातील दहशतवादी पकडला गेला, तो पाकिस्तानी असल्याचे पाकिस्ताननेही स्वीकारले, पण, काँग्रेसने मतांच्या राजकारणासाठी हा हल्ला भगवा दहशतवाद असल्याचा प्रचार केला. हिंदू दहशतवादी अशी व्याख्या करून देशात हिंदू दहशतवाद पसरवत असल्याची प्रतिमा निर्माण करण्याचा काँग्रेसचा खटाटोप सुरू होता. देशाच्या सुरक्षेचा काँग्रेसने बळी दिला. तुष्टीकरणासाठी दहशतावादविरोधी कायदे रद्द केले, असा हल्लाबोल करून मोदींनी काँग्रेसची कोंडी केली.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी ठार : शहा
पहलगामच्या दहशतवाद्यांचे काय झाले, ऑपरेशन सिंदूरमधून काय मिळाले, असे प्रश्न विरोधक विचारत होते. पण, त्यांना स्पष्टपणे सांगतो की, पहलगाम हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सुनियोजित मोहिमेअंतर्गत त्यांना ठार करण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांना संपवले तर, आपल्या संरक्षण दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमध्ये घुसून या दहशतवाद्यांच्या आकांचाही (सूत्रधार) खात्मा केला. मोदी सरकार दहशतवाद सहन करत नाही. हे सरकार म्हणजे मनमोहन सिंग सरकार नव्हे, ज्यांच्या काळात दहशतवाद्यांना पायघड्या घालून बोलवले जात होते, असा घणाघाती शाब्दिक हल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.
‘दिवाळखोर परराष्ट्र धोरणाचा परिणाम’
दिवाळखोर परराष्ट्र धोरणामुळे पाकिस्तान-चीन यांचे ‘फ्युजन’ झाले असून भारताला एकाचवेळी दोन्ही देशांच्या विरोधात लढावे लागत आहे. याला पंतप्रधान, संरक्षणमंत्री, परराष्ट्र मंत्री घाबरले असावेत, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.
‘बैसरन पठारावर सुरक्षा का नव्हती’
माझ्या आईच्या अश्रूंपर्यंत तुम्ही पोहोचलात, पण तुम्ही पहलगाममध्ये दहशतवादी आले कसे हे सांगितलेच नाही. बैसरन पठारावर सुरक्षा तैनात का नव्हती हेदेखील तुम्ही सांगितले नाही. इथे मी सांगू इच्छिते की, माझ्या आईने अश्रू ढाळले जेव्हा माझ्या वडिलांचे दहशतवाद्यांनी प्राण घेतले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात कुटुंबातील व्यक्तीला गमावण्याचे दु:ख काय असते हे आम्हाला माहीत आहे. पहलगाममध्ये प्राण गमावलेल्या कुटुंबीयांचे दु:ख समजते, अशा शब्दांत काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी-वढेरा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना प्रत्युत्तर दिले.