Monsoon horror in Himachal Pradesh cloudbursts, floods and landslides : हिमाचल प्रदेश एकाच वेळी अनेक नैसर्गिक आव्हानांचा सामना करत आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत, रस्ते खचले आहेत, अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटी झाली असून नद्यांना महापूर आला आहे. मुसळधार पावसामुळे सगळीकडे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळून काही ठिकाणी माणसं मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. ढगफुटीपासून ते भूस्खलनापर्यंत आणि नद्यांच्या प्रलयंकारी पूरापर्यंत, या नैसर्गिक आपत्तींमुळे हजारो कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर मोठी जीवितहानी देखील झाली आहे. निसर्गाच्या या भयावह रुपासमोर सगळेच हतबल झाल्याचं पाहायला मिळत आहे.
२०२३ मधील मुसळधार पावसामुळे राज्यात झालेली जीवितहानी लोक अजून विसरले नाहीत. दोन वर्षांपूर्वी पूर व भूस्खलनामुळे राज्यात ४०० हून अधिक लोकांचा बळी गेला होता. त्या भयावह आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा राज्यात तशीच स्थिती निर्माण झाली आहे. अजून राज्याच्या सर्व भागात मान्सून दाखल झालेला नाही. त्याआधीच ठिकठिकाणी मोठमोठी नैसर्गिक संकटं उभी राहिली आहेत. त्यामुळे मान्सून पूर्णपणे राज्यात दाखल होईल तेव्हा काय स्थिती असेल या विचारानेच लोक घाबरले आहेत.
७८ जणांचा मृत्यू, ३७ जण बेपत्ता
राज्यात मुसळधार पाऊस, नद्यांना आलेला पूर व दरड कोसळून आतापर्यंत ७८ लोकांचा जीव गेला आहे. तसेच ३७ जण बेपत्ता आहेत. यासह ११५ जण जखमी असून त्यांच्यावर उपचार चालू आहे.
मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. दोन राष्ट्रीय महामार्गांसह २५० हून अधिक रस्ते बंद आहेत. वीजेचे २७८ ट्रान्सफॉर्मर्स बंद पडले आहेत. यासह २६१ जलप्रकल्प बंद आहेत. थुनांग येथील एका सहकारी बँकेचं कार्यालय वाहून गेलं आहे. थुनांग भागात ही एकमेव बँक होती. येथील लोकांचे आर्थिक व्यवहार या बँकेवर अवलंबून होते. मात्र, त्या बँकेचं कार्यालय वाहून गेल्यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. यासह मोठी वित्तहानी देखील झाली आहे.
हवामान विभागाकून १० जिल्ह्यांना इशारा
मुसळधार पावसामुळे अनेक लहान-मोठ्या नद्यांना पूर आला आहे. ज्यामुळे लोकांच्या घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर, हवामान विभागाने सिरमौर, कांगडा, मंडी या तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. तर, शिमला, सोलन, हमीरपूर, बिलासपूर ऊना, कुल्लू व चम्बा या सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.