Parliament Monsoon Session 2025 : पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची घटना आणि त्यानंतर भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानला दिलेल्या जोरदार प्रत्युत्तराबाबत आज संसदेत चर्चा पार पडली आहे. ऑपरेशन सिंदूरसंदर्भात चर्चा पार पडत असताना सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरवरून आणि भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवरून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्या प्रश्नांना आज (२९ जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंदूर संदर्भात विरोधकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर भाष्य केलं. तसेच ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानकडून देण्यात आलेल्या अणुबॉम्बच्या धमक्यांबाबतही मोदींनी स्पष्टीकरण दिलं. तसेच ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताला कोणत्या देशांनी पाठिंबा दिला होता, याचीही माहिती त्यांनी सांगितली. तसेच भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधी कशी झाली? कोणाचा फोन आला होता? याचाही खुलासा मोदींनी केला आहे.
नेमकं काय घडलं?
पंतप्रधान मोदींनी सभागृहात बोलताना विरोधकांवर जोरदार टीका केली.मोदींनी टीका केल्यामुळे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावरून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना चांगलेच खडेबोल सुनावले. ओम बिर्ला यांनी म्हटलं की, “विरोधी पक्षनेते राहुल गांधींजी तुमचं भाषण सर्वांनी ऐकलं आहे. मात्र, आता तुम्ही बसल्या बसल्या कोणतीही टिप्पणी करू नका. ये तुमच्यासाठी योग्य ठरणार नाही.”
भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधी कशी झाली? मोदींचा खुलासा
“जगातील कोणत्याही नेत्याने भारताला ऑपरेशन सिंदूर थांबवण्यास सांगितलं नाही. मला ९ मे रोजी रात्री अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वान्स यांचा फोन आला होता. एका तासांहून अधिकवेळ ते फोन करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यावेळी माझी सैन्यांबरोबर मीटिंग सुरू होती. त्यानंतर एका तासांनी मी पुन्हा त्यांना फोन केला आणि त्यांना म्हटलं की तुमचा दोन ते तीन वेळा फोन आला आहे, बोला. तेव्हा मला उपराष्ट्राध्यक्ष जेडी वान्स यांनी सांगितलं की, पाकिस्तान मोठा हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहे. असं त्यांनी मला सांगितलं. तेव्हा माझं त्यांना उत्तर होतं की, जर पाकिस्तानचा हा हेतू असेल तर त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, हे पाकिस्तानला महागात पडेल. जर पाकिस्तानने हल्ला केला तर आम्ही मोठा हल्ला करून प्रत्युत्तर देऊ”, असं अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वान्स यांना मी सांगितलं होतं, असं मोदी यांनी म्हटलं आहे.
ऑपरेशन सिंदूर थांबविण्यासाठी पाकिस्ताननं गयावया केली
भारताने जागतिक नेत्यांच्या सांगण्यावरून शस्त्रविराम करण्याचा निर्णय घेतला, असा आरोप विरोधकांनी केला होता. या आरोपाला उत्तर देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पाकिस्तानकडून शस्त्रविराम करण्यासाठी गयावया करण्यात आली. पाकिस्तानच्या डीजीएमओ यांच्या विधानाचा हवाला देताना पंतप्रधान मोदींनी म्हटले, “तुम्ही खूप मारले. आता आणखी मार खाण्याची आमच्यात ताकद नाही. बस करा.”
“ऑपरेशन सिंदूरची सुरुवात केल्यानंतर काही मिनिटांतच भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानला सांगितले की, आम्ही या या ठिकाणांवर हल्ला केला आहे आणि आमचे पुढील लक्ष्य काय आहे. आपल्या सैन्याने ठरविलेल्या लक्ष्याचा १०० टक्के लक्ष्यभेद केला. हे ऐकल्यानंतर पाकिस्तानने दहशतवाद्यांपासून हात झटकण्याऐवजी त्यांची साथ दिली. त्यानंतर भारताने पुढील लक्ष्य भेदले”, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली.