बिहारच्या सीवान जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील मैरवा परिसरात राहत असलेल्या ११ वर्षीय अल्पवयीन मुलीबरोबर ४० वर्षीय व्यक्तीने लग्न केलं आहे. मुलीच्या आईने कर्जाची परतफेड केली नसल्याने ४० वर्षीय व्यक्तीने या मुलीबरोबर लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे संपूर्ण प्रकरण?

महेंद्र पांडे असं लग्न करणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. तो मैरवा परिसरातील लक्ष्मीपूर गावाचा रहिवाशी आहे. महेंद्र पांडेने मुलीच्या आईला २ लाख रुपयांचं कर्ज दिलं होतं. ते पैसे महेंद्र पांडे परत मागत होता. पण, परिस्थिती नसल्याने मुलीच्या आई पैसे परत केले नाहीत. यानंतर महेंद्र पांडेने ११ वर्षीय मुलीबरोबर लग्न करत, तिला आपल्या घरी नेलं.

हेही वाचा : श्रद्धा वालकर हत्या प्रकरण : आफताबविरुद्ध आरोपनिश्चितीवर ९ मे रोजी निर्णय

पीडित मुलीच्या आईने सांगितलं, “लक्ष्मीपूर गावात आमचे कुटुंबीय आहेत, जिथे ११ वर्षीय मुलगी येत जात होती. त्याच गावातील महेंद्र पांडेंनी मला म्हटलं की, तुमच्या मुलीला माझ्याघरी ठेवत, तिला शिक्षण देईन. मात्र, महेंद्रने तिच्याबरोबर लग्न केलं. माझी मुलगी परत आली पाहिजे,” अशी मागणी पीडितेच्या आईने केली आहे.

कोण आहे महेंद्र पांडे?

४० वर्षीय महेंद्र पांडेंचं लग्न झालं असून, त्याला दोन मुलं आहेत. ११ वर्षीय अल्पवयीन मुलीशी लग्न केल्यावर महेंद्र पांडे सातत्याने वक्तव्य बदलत आहे. कधी तो म्हणतोय की, ‘लग्न करून मी चुक केली, मिळेल ती शिक्षा भोगण्यास तयार आहे.’ तर कधी सांगतोय की, ‘मी तिला मुलगी म्हणून घरी आणलं आहे. तिला कुठे जायचं तिथे जाऊ शकते.’ तर कधी मुलीच्या आईला फोन करून धमकी देतो की, ‘जर लग्नाची माहिती पसरवली तर, तुला अडकवून टाकेन.’

पीडित मुलीने सांगितलं की, “आईने महेंद्र पांडेकडून कर्ज घेतलं होतं. कर्जाची रक्कम मला माहिती नाही. पण, आई मला महेंद्र पांडेजवळ सोडून गेली.” मात्र, मुलीच्या आईने दावा केला होता की, “महेंद्र पांडेने शिक्षण देण्याच्या नावाखाली घेऊन गेला आणि तिच्याशी लग्न केलं”

हेही वाचा : धक्कादायक! महिला प्रवाशाच्या बॅगेत सापडले चक्क २२ साप; चेन्नई विमानतळावरील घटना, VIDEO व्हायरल

याप्रकरणी मैरवा पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण सरकारी नंबर बंद होता. तर, सीवानचे पोलीस अधिकारी कुमार सिन्हा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी फोन उचलला नाही. याबाबत ‘आज तक’ने वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother could not return loan 40 year old man married 11 year old daughter sivan bihar ssa
First published on: 30-04-2023 at 14:54 IST