छत्तीसगडमधील एका शहीद पोलिसाच्या आईने आपल्या मुलाचा पुतळा उभारला आहे. जासपूर जिल्ह्यामधील पेल्वा आरा या गावामध्ये पोलीस जवान बशील टोप्पो यांच्या आईने नक्षल हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या आपल्या मुलाचा पुतळा उभारला आहे. बस्तरमध्ये २०११ साली झालेल्या हल्ल्यामध्ये बशील शहीद झाले होते.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बशील यांच्या या पुतळ्याला त्यांच्या आईने रंगरंगोटी करुन घेतली आहे. दरवर्षी रक्षाबंधनाला बशील यांची बहीण आवर्जून या पुतळ्याला राखी बांधते. आपल्या मुलाची शौर्यगाथा लोकांपर्यंत पोहचावी या उद्देशाने बालीस यांच्या आईने हा पुतळा उभारला आहे. एखाद्या छोट्या मंदिराप्रमाणे ही जागा त्यांनी बांधली असून त्या महत्वाच्या दिवशी, सणासुदीला या पुतळ्याची आवर्जून साफसफाई करतात.

Image

“मला त्याचा फार अभिमान वाटतो,” असं ही बशील यांच्या आईने एएनआयशी बोलताना सांगितलं आहे. गावातील शाळेच्या बाजूलाच बशील यांचं हे स्मृतीस्थळ उभारण्यात आलं आहे. बशील हे शहीद झाल्यानंतर गावामध्ये त्याचं स्मारक उभरण्याचा शब्द सरकारने दिला होता. मात्र दोन वर्ष काहीच हलचाली झाल्या नाहीत म्हणून कुटुंबियांनी स्वत:च एक छोटं स्मारक उभारलं. या स्मारकाच्या वरील बाजूस बशील यांचं नाव असून खाली त्यांची जन्म तारीख आणि शहीद झाल्याची तारीख लिहिण्यात आलीय.

Image

बशील यांच्या आईने या स्मारकासाठी बरीच धडपड केली आणि आपल्या मुलाच्या शौर्याची गोष्ट गावकऱ्यांना कायम लक्षात रहावी म्हणून हे स्मारक उभारलं. गावकरीही प्रत्येक सणासुदीला आवर्जून या ठिकाणी आदरांजली अर्पण करण्यासाठी येतात. या स्मारकाच्या ठिकाणी दर दिवाळीला दिवे आणि मेणबत्त्या लावले जातात. प्रत्येक नाताळाला येथे गावकरी एकत्र येऊन केकही कापतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूर्वी या गावामध्ये फारश्या सुविधा नव्हत्या. मात्र एका आईने संघर्षामधून आपल्या शहीद मुलाचं स्मारक उभारल्यानंतर हे गाव चर्चेत आल्यावर प्रशासनाने या गावामध्ये अनेक विकास कामं केली आहेत. या स्मारकासाठी हे गाव पंचक्रोषीमध्ये शहीदाचं गाव म्हणून ओळखलं जातं. या गावामध्ये आदिवासी लोकसंख्या अधिक आहे.