Operation Sindoor News: मध्य प्रदेशातील एका मंत्र्याने कर्नल सोफिया कुरेशी यांना “दहशतवाद्यांची बहीण” असे संबोधून भाजपाला अडचणीत आणल्यानंतर आता मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांनी भारतीय सैन्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पायावर नतमस्तक आहे, असे विधान करून वाद निर्माण केला आहे.

उपमुख्यमंत्री जगदीश देवदा शुक्रवारी जबलपूर येथे नागरी संरक्षण स्वयंसेवकांच्या प्रशिक्षण सत्रात बोलत होते. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की, “मी पंतप्रधानांचे आभार मानू इच्छितो. संपूर्ण देश, देशाचे सैन्य आणि सैनिक त्यांना नतमस्तक होत आहेत. त्यांनी दिलेल्या प्रत्युत्तराबद्दल संपूर्ण देश त्यांच्या पायाशी नतमस्तक होत आहे.”

मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांच्या या विधानावर टीका झाल्यानंतर, ते म्हणाले, “काँग्रेस माझे विधान चुकीच्या पद्धतीने सादर करत आहे. माझे विधान बदलण्यात आले आहे आणि ते चुकीच्या पद्धतीने सादर केले जात आहे.”

या प्रकरणी स्पष्टीकरण देताना जगदीश देवदा म्हणाले की, “मी म्हणालो होतो की देशाच्या सैन्याने ऑपरेशन सिंदूरमध्ये प्रचंड काम केले आहे. यासाठी देशातील जनता भारतीय सैन्यापुढे नतमस्तक आहे. जे कट रचत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. माझ्या वाक्याचा अर्थ असा होता की, ‘देश की जनता भारत की सेना के चरणों में नतमस्तक है’ कारण ते आपले आणि देशाचे रक्षण करतात. काँग्रेस नैराश्यात असल्याने असे बोलत आहे, त्यांनी आरशात पाहून ते कोणत्या स्थितीत आहेत ते पहावे.”

काँग्रेस नेत्या आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा म्हणाल्या की, “भाजपा नेत्यांकडून आपल्या सैन्याचा सतत होणारा अपमान अत्यंत लज्जास्पद आणि दुर्दैवी आहे.”

“प्रथम, मध्य प्रदेशच्या एका मंत्र्याने महिला सैनिकांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली आणि आता त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांनी लष्कराचा घोर अपमान केला आहे. देशातील सर्व नागरिकांना लष्कराच्या शौर्याचा अभिमान आहे, परंतु भाजपामधील लोक लष्कराचा अपमान करत आहेत. या नेत्यांवर कारवाई करण्याऐवजी, भाजपा त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे,” असे प्रियांका यांनी एक्सवर लिहिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपा प्रवक्ते आशिष अग्रवाल यांनी काँग्रेसच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले की, “काँग्रेस पक्षाला देशाच्या सैन्याबद्दल आदर नाही. देवडाजींनी अगदी बरोबर म्हटले आहे, संपूर्ण देश, देशाची सेना, पाकिस्तानला प्रत्युत्तर देणाऱ्या सैनिकांना नतमस्तक आहे.”