Mumbai to Ahmedabad Bullet Train: भारताची पहिली बुलेट ट्रेन सेवा लवकरच मुंबई-अहमदाबाद मार्गावर सुरू होणार आहे. याबाबत रेल्वे मंत्री यांनी नुकतेच सुतोवाच केले. गुजरातच्या भावनगर येथील एका कार्यक्रमात बोलत असताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, भारताची पहिली वहिली बुलेट ट्रेन लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहे. एकदा का ही सेवा सुरू झाली तर मुंबई – अहमदाबाद या दोन शहरातील अंतर केवळ २ तास ७ मिनिटांत (१२७ मिनिटे) पार करता येणार आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, “मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणारी बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पाचे काम जलद गतीने सुरू आहे. जेव्हा बुलेट ट्रेन धावायला लागेल तेव्हा मुंबई ते अहमदाबाद प्रवासासाठी केवळ दोन तास सात मिनिटांचा वेळ लागेल.”
भावनगर येथून सुरू होणाऱ्या नव्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखविण्यासाठी रेल्वे मंत्री भावनगर टर्मिनसवर आले होते. याठिकाणी आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. भावनगर टर्मिनस – अयोध्या एक्सप्रेस, रेवा – पुणे एक्सप्रेस आणि जबलपूर – रायपूरला जोडणाऱ्या एका नव्या ट्रेनचा शुभारंभ आज करण्यात आला.
कसा आहे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प
५०८ किमींच्या मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्पात मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिमिमोरा, सूरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती अशी एकूण १२ स्थानके समाविष्ट आहेत. महाराष्ट्रातील चार स्थानके या मार्गावर आहेत.
प्रकल्पाचा खर्च किती?
मुंबई – अहमदाबाद बुले ट्रेन प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च १,०८,००० कोटी रुपये आहे. यापैकी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (JICA) कडून प्रकल्प खर्चाचा ८१ टक्के निधी ८८,००० कोटी रुपये देणार आहे.
प्रकल्प कधी पूर्ण होणार?
नुकतेच लोकसभेत एका लेखी उत्तरात माहिती देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले होते की, वापी आणि साबरमती दरम्यानच्या भागाचे काम २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. संपूर्ण प्रकल्प (महाराष्ट्र ते साबरमती विभाग) डिसेंबर २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तथापि, बुलेट ट्रेन प्रकल्प हा अतिशय गुंतागुंतीचा प्रकल्प आहे, असेही त्यांनी नमूद केले होते.