scorecardresearch

स्वत:च राबवलेल्या सर्वेक्षणातून मस्क यांचा मुखभंग; ट्विटरच्या ‘सीईओ’पदावरून पायउतार होण्याचा बहुमताचा कौल

ट्विटरचा ताबा मिळवल्यापासून सातत्याने वादात आणि चर्चेत असलेले ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांना नेटकरींनी त्यांच्याच सापळय़ात अडकवले.

स्वत:च राबवलेल्या सर्वेक्षणातून मस्क यांचा मुखभंग; ट्विटरच्या ‘सीईओ’पदावरून पायउतार होण्याचा बहुमताचा कौल
एलॉन मस्क – संग्रहीत छायाचित्र (pic credit – twitter)

पीटीआय, न्यूयॉर्क: ट्विटरचा ताबा मिळवल्यापासून सातत्याने वादात आणि चर्चेत असलेले ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांना नेटकरींनी त्यांच्याच सापळय़ात अडकवले. ‘ट्विटरच्या प्रमुखपदावरून मी पायउतार व्हावे का?’ अशी ऑनलाइन मतचाचणी राबवणाऱ्या मस्क यांना ५७.५ ‘मतदारां’नी ‘हो’चा कौल देत धक्का दिला. ‘मतचाचणीच्या निकालाशी मी बांधील राहीन,’असे सर्वेक्षणापूर्वी सांगणाऱ्या मस्क यांनी निकालानंतर मात्र, मौन बाळगले आहे.

ट्विटरचे प्रमुखपद स्वीकारल्यापासून मस्क वादग्रस्त निर्णय आणि वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. ट्विटरमधील उच्च पदस्थांची हकालपट्टी, नोकरकपात, खातेदार पडताळणीची ‘ब्लू टिक’ अशा निर्णयांमुळे ‘ट्विटर’बद्दल अस्थिरतेचे वातावरण निर्माण केल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. अशातच रविवारी त्यांनी मतचाचणीची टूम काढली. ‘ट्विटरच्या प्रमुखपदावरून मी पायउतार व्हावे का? या मतचाचणीच्या निकालाशी मी बांधिल राहीन’, असे ट्वीट त्यांनी केले. त्यानंतर सोमवार सकाळी या मतचाचणीची मुदत संपेपर्यंत, जवळपास पावणेदोन कोटी ट्विटर वापरकर्त्यांनी या ट्विटरचाचणीत सहभाग् घेतला. त्यापैकी ५७.५ टक्के जणांनी मस्क यांच्या प्रश्नाला होकारार्थी उत्तर देत त्यांना पायउतार होण्याचा संदेश दिला.

‘काळजीपूर्वक मतदान करा. तुम्ही जी इच्छा व्यक्त कराल ती कदाचित पूर्ण होईल,’असे ट्वीटही मस्क यांनी रविवारी उशिरा केले होते. मात्र, तरीही ‘मतदारांनी’ त्यांच्या विरोधात कौल दिला. या चाचणीवर मस्क यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, आजवर राबवलेल्या अशा मतचाचण्यांतील निकालाचे त्यांनी पालन केले आहे. त्यामुळे आता ते ट्विटरच्या प्रमुखपदावरूनही पायउतार होणार का, याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

अन्य समाजमाध्यमांच्या प्रसारावर बंदी

मस्क यांनी ट्विटरच्या धोरणांत अनेक बदल करण्याचे जाहीर केले होते. त्याचाच एक भाग म्हणून ट्विटरवरून अन्य समाजमाध्यमांचा प्रसार करण्यास बंदी आणण्यात आली असून अशी खाती बंद करण्याचे ट्विटरने जाहीर केले आहे. ‘फेसबुक, इन्स्टाग्राम, मॅस्टोडॉन.. यासारख्या समाजमाध्यमांचा प्रसार करणाऱ्या मजकुराशी संबंधित खाती आम्ही हटवू,’ असे ट्विटरच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. याचाच अर्थ एखादा वापरकर्ता आपल्या अन्य समाजमाध्यम खात्यांची नावे वा ‘लिंक’ देत असेल तर ट्विटर त्याचे खाते हटवू शकेल.

हेही वाचा – Billionaires List: पहिल्या स्थानावर अधिक काळ राहू शकतात Bernard Arnault, कारण Musk यांना बसलाय मोठा फटका

मस्क यांचे निर्णय

  • ट्विटर ताब्यात घेताच सीईओ पराग अग्रवालसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची हकालपट्टी.
  • ऑक्टोबर महिन्यात निम्म्या कर्मचाऱ्यांची कपात.
  • खातेदाराची अधिकृत ओळख पडताळणी करणाऱ्या ‘ब्लू टिक’साठी आधी शुल्कआकारणी. नंतर निर्णय रद्द.
  • द्वेषमूलक, असत्य बातम्या पसरवत असल्याचा आरोप.
  • ट्विटरच्या जुन्या निर्णयांची माहिती प्रसारमाध्यमांत उघड करण्याचा निर्णय. मात्र, ठरावीक पत्रकारांनाच माहिती पुरवत असल्याचा आरोप.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या