काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर अशी पहिली ‘भारत जोडो यात्रा’ काढली होती. पहिल्या टप्प्यात राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर असा सुमारे ४ हजार किलोमीटरचा पायी प्रवास केला होता. यानंतर आता राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. गुजरात ते ईशान्य भारतातील मेघालयपर्यंत ही पदयात्रा काढली जाणार आहे, याबाबतची माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
“राहुल गांधींच्या दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो यात्रेची सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्रातही आम्ही पदयात्रा काढणार आहोत. पूर्व विदर्भात माझ्या नेतृत्वात पदयात्रा काढली जाणार आहे. तर पश्चिम विदर्भात आमचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पदयात्रा काढणार आहेत. उत्तर महाराष्ट्रात बाळासाहेब थोरात, मराठवाड्यात अशोक चव्हाण, पश्चिम महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण आणि मुंबईत वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा निघणार आहे. कोकणातील पदयात्रेत आमच्या पक्षाचे सर्वच नेते सहभागी होतील. असं आमच्या पदयात्रेचं नियोजन आहे”, अशी माहितीही नाना पटोले यांनी दिली.
“या पदयात्रेनंतर आम्ही महाराष्ट्रात ‘बस यात्रा’ सुरू करणार आहोत. ‘बस यात्रे’दरम्यान महाराष्ट्रातील आमचे सर्व नेते एकत्र असतील. प्रत्येक ठिकाणी आमच्या सभा होतील. आम्ही लोकांशी चर्चा करणार आहोत. लोकांच्या अडचणी समजून घेणार आहोत. केंद्र आणि राज्य सरकारच्या कमतरता लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत. हे सरकार कशाप्रकारे शेतकरी, युवक आणि गरीबांच्या विरोधात आहे. हे सरकार कशाप्रकारे लोकशाही संपवू पाहत आहे, ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. या यात्रेच्या माध्यमातून येत्या काळात महाराष्ट्रात मोठं परिवर्तन पाहायला मिळणार आहे”, असंही नाना पटोले यांनी नमूद केलं.