लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. एनडीएच्या प्रमुखपदी एकमताने नरेंद्र मोदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आज एनडीएच्या संसदीय दलाची संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत सर्व एनडीएच्या नेत्यांनी नरेंद्र मोदी यांची संसदीय दलाचे नेते म्हणून निवड केली. आता नरेंद्र मोदी रविवारी ९ जून रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी काही परदेशी पाहुण्यांनाही आमंत्रण दिलं असल्याची माहिती आहे.

या शपथविधीच्या सोहळ्याला जगातील अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे हे यांना आमंत्रित करण्यात आल्याचं वृत्त आहे. तसेच नेपाळ आणि मॉरिशसच्या प्रमुखांनाही या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण दिलं आहे. याबरोबरच या शपथविधी सोहळ्यासाठी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनाही निमंत्रण देण्यात आलं असल्याचं वृत्त आहे.

हेही वाचा : नरेंद्र मोदींच्या शपथविधीची तारीख आणि वेळ दोन्ही ठरलं! ‘या’ दिवशी होणार सोहळा

गेल्या काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप बेटांना भेट दिली होती. नरेंद्र मोदींनी या दौऱ्यानंतरचे काही फोटो समाजमाध्यमांवर शेअर केले होते. भारत गेल्या काही महिन्यांपासून लक्षद्वीपचा आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून प्रचार करत असतानाच स्वतः पंतप्रधान मोदी यांनी यासाठी पुढाकार घेतल्यानंतर अनेकांचं लक्ष लक्षद्वीपकडे वळलं. मात्र, त्यानंतर मालदीव या देशातील काही लोकांचा तिळपापड झाला. मालदीवमधील काही नागरिकांनी आणि मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी आक्षेपार्ह टिप्पण्णी केली होती. त्यातच मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनी भारतीय सैन्य माघारी घेण्यास सांगितले होते. त्यामुळे भारत आणि मालदीवमधील संबंध ताणले गेले होते.

आता नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधिच्या सोहळ्याचे निमंत्रण मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनाही देण्यात आलं आहे. त्यामुळे मालदीव आणि भारताचे संबंध सुधारण्यासाठी मालदीवकडे ही एक संधी असणार आहे. त्यामुळे या शपथविधिच्या सोहळ्याचे निमंत्रण मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू स्वीकारणार का? तसेच या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार का? हे पाहणे महत्वाचं असणार आहे. दरम्यान, या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदींना जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव

मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाच्या खूर्चीवर विराजमान होणार असल्याच्या वृत्तानंतर जगभरातील नेत्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेंन, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासह ७५ हून अधिक जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केलं. यात मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचाही समावेश आहे.