Narendra Modi On India Alliance : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (२ मे) केरळच्या तिरुवनंतपुरम येथील विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचं उद्घाटन पार पडलं. या कार्यक्रमात काँग्रेस नेते तथा खासदार शशी थरूर आणि केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन हे देखील उपस्थित होते. त्यामुळे या कार्यक्रमाकडे अनेकाचं लक्ष लागलं होतं. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका केली. तसेच मोदींनी यावेळी बोलताना केलेल्या एका विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. ‘आजच्या कार्यक्रमामुळे अनेकांची झोप उडणार आहे’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचं उद्घाटन केल्यानंतर भाषणात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “मुख्यमंत्री पिनारायी विजयन देखील या ठिकाणी बसलेले आहेत. ते इंडिया आघाडीचे एक मजबूत आधारस्तंभ आहेत. तसेच आज या ठिकाणी काँग्रेस नेते शशी थरूरही बसलेले आहेत. त्यामुळे आजच्या कार्यक्रमामुळे अनेकांची झोप उडणार आहे. हा संदेश जिथे जायचा होता तिथे गेला”, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या या विधानाचा रोख नेमकं कोणाकडे होता? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आज तिरुवनंतपुरम येथील विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदर प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात त्यांनी ही टिप्पणी केली. दरम्यान, काँग्रेस नेते शशी थरूर हे तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. तसेच ते इंडिया आघाडीचे एक प्रमुख सदस्यही आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर मिश्किल टिप्पणी केली असली तरी राजकीय विरोधकांना अस्वस्थ करण्याच्या उद्देशाने हे वक्तव्य असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारताची भूमिका आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी राजनैतिक चर्चा करणे यासह अनेक मुद्द्यांवरून शशी थरूर यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची प्रशंसा केल्याचंही काही दिवसांपूर्वी पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आज पंतप्रधान मोदी आणि शशी थरूर हे एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं. तसेच यावेळी पंतप्रधान मोदींनी व्यासपीठावर शशी थरूर यांच्याशी काही वेळ संवाद देखील साधला. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि शशी थरूर यांच्यातील संवादानेही अनेकांचं लक्ष वेधलं.