नवी दिल्ली : आरोप-प्रत्यारोपांच्या संघर्षमय वातावरणातही मंगळवारी राज्यसभेत हलके-फुलके क्षण सदस्यांना अनुभवता आले. दोन भारतीय चित्रनिर्मितींना प्रतिष्ठेचा ऑस्कर पुरस्कार मिळाल्याबद्दल वरिष्ठ सभागृहात पुरस्कारविजेत्यांचे कौतुक करण्यात आले. इथेही अभिनंदनाच्या भाषणात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपला टोमणा मारण्याची संधी सोडली नाही.

‘या पुरस्कारांचे श्रेय मोदींनी घेऊ नये.. पहिल्यांदाच भारतीय चित्रनिर्मितीला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. दोन्ही पुरस्कारांचे मानकरी दक्षिण भारतीय असून त्यांचा मला अभिमान वाटतो. मला इथे भाजपला एकच विनंती करायची आहे की, या पुरस्कारांचे श्रेय त्यांनी घेऊ नये. नाही तर म्हणाल की, कविता आम्हीच लिहिली, नृत्य दिग्दर्शन आम्हीच केले, मोदींनी हा चित्रपट दिग्दर्शित केला..’, असे खरगे मिश्कीलपणे म्हणाले.

खरगेंनी केलेली ही गंमत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी मनावर घेतली नाही, उलट त्यांनीही खरगेंच्या विनोदाला भरभरून दाद दिली. पीयूष गोयल, भूपेंद्र यादव, एस. जयशंकर, मनसुख मंडाविया या केंद्रीय मंत्र्यांसह राज्यसभेचे सभापती जगदीप धनखडही सभागृहातील हास्यकल्लोळात सहभागी झाले. ‘आर. आर. आर.’ या तेलुगु चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्यासह ‘एलिफंट विस्परर’ या माहितीपटाला ऑस्कर पुरस्काराने गौरवण्यात आले. जागतिक स्तरावरील प्रतिष्ठेचा हा पुरस्कार पहिल्यांदाच भारतीय चित्रनिर्मितीला मिळाला आहे. राज्यसभेत मंगळवारी शून्य प्रहरामध्ये दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी ऑस्करविजेत्यांचे अभिनंदन केले.  

मी अभिनेता झालो असतो -धनखड

राज्यसभेत ऑस्करविजेत्यांच्या आनंद सोहळय़ात सदस्यांची आतषबाजी सुरू असताना सभापती धनखड यांनी आपल्यालाही अभिनेता व्हायचे होते, अशी कबुली दिली. मी वकील झालो नसतो तर अभिनेता नक्की असतो. कुठे ना कुठे अभिनय करताना तुम्हाला मी दिसलो असतो, असे धनखड म्हणाले.