पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध वृत्तवाहिन्या, वृत्तसंस्था आणि वृत्तपत्रांना मुलाखती देत आहेत. दरम्यान, एका मुलाखीत भ्रष्टाचारावर बोलताना मोदी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार, मनी लॉन्डरिंगवर त्यांची रोखठोक मतं मांडली. पंतप्रधान मोदी म्हणाले, “केंद्रीय तपास यंत्रणा देशभर जी कारवाई करत आहेत त्यात माझी काहीच भूमिका नाही. देशात सध्या भ्रष्ट लोकांचं महिमामंडन होतंय आणि हा देशासाठी खूप चिंतेचा विषय आहे. पूर्वी एखाद्या व्यक्तीवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले किंवा एखाद्या व्यक्तीवर भ्रष्टाचाराप्रकरणी कारवाई व्हायची तेव्हा लोक अशा भ्रष्टाच्यारी लोकांपासून किंवा त्या आरोपींपासून १०० पावलं दूर राहाणं पसंत करायचे. परंतु, हल्ली अशा लोकांना खांद्यावर घेऊन नाचण्याची परंपरा सुरू झाली आहे.”

पंतप्रधान मोदी म्हणाले, “काही लोक कालपर्यंत ज्या गोष्टींची वकिली करायचे, त्याच गोष्टी आता आपल्या देशात घडू लागल्या आहेत तर त्याचा विरोध करू लागले आहेत. पूर्वी हेच लोक (अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी) म्हणायचे की सोनिया गांधींना (काँग्रेसच्या माजी अध्यक्षा) तुरुंगात टाका आणि आता ते लोक सोनिया गांधींच्या बाजूला जाऊन बसले आहेत. हेच लोक भ्रष्टाचाराविरोधात चालू असलेल्या कारवाईचा विरोध करत आहेत. पूर्वी एखादं भ्रष्टाचाराचं प्रकरण उघडकीस आलं तर त्या प्रकरणात एखाद्या लहान-मोठ्या व्यक्तीला शिक्षा व्हायची. आता मोठे मासे गळाला लागतायत तर काही लोकांचा त्यालाही विरोध असतो. हे पाहून मला आश्चर्य वाटतं.” मोदी आयएएनएसशी बोल होते.

हे ही वाचा >> “…म्हणून २००४ मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला नाही”, सुधाकरराव नाईकांचा उल्लेख करत अजितदादांनी सांगितली पवारांची भीती

मोदी म्हणाले, काही लोक आपल्या देशाविरोधात चुकीचं जनमत तयार करू पाहत आहेत. या लोकांनी देशाचं खूप मोठं नुकसान केलं आहे. पूर्वी आपल्या देशात बाहेरच्या देशातून वस्तू आयात केल्या जायच्या, तेव्हा हे लोक म्हणायचे आपला देश विकला जातोय. आता आपल्या गरजेच्या वस्तू देशातच बनवल्या जात आहेत तर तेच लोक म्हणू लागलेत की ग्लोबलायजेशनचा काळ आहे आणि तुम्ही देशातच वस्तू बनवण्याच्या गोष्टी करताय? यांना नेमकं हवंय तरी काय? जर अमेरिकेत कोणी म्हटलं की, बी अमेरिकन, बाय अमेरिकन (Be American, Buy American) तर त्यावर तिथल्या लोकांमध्ये अभिमानाची भावना जागृत होते. परंतु, मी जर ‘व्होकल फॉर लोकल’ (Vocal for Local) असं म्हटलं की, काही लोक माझ्याबद्दल अपप्रचार करतात की मी ग्लोबलायजेशनच्या विरोधात आहे. अशा वेळी मी केवळ आपल्या देशातील लहान-मोठ्या व्यापाऱ्यांचा विचार करत असतो.