scorecardresearch

“नेहरू म्हणायचे मला गाढव म्हणा पण हिंदू नाही”; भाजपा नेत्याचं वक्तव्य

संघामुळेच काही प्रमाणात हिंदू जिवंत आहे, असंही ते म्हणाले.

“नेहरू म्हणायचे मला गाढव म्हणा पण हिंदू नाही”; भाजपा नेत्याचं वक्तव्य
(संग्रहित छायाचित्र)

राजस्थानमधील चित्तौडगड जिल्ह्यातील डुंगला भागातील शिवमंदिर पाडल्याचे प्रकरण आता चांगलेच तापू लागले आहे. भाजपा नेते गुलाबचंद कटारिया रविवारी घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी त्यांनी लोकांना वेळीच सावध राहण्यास सांगितले. यादरम्यान त्यांनी एक वादग्रस्त विधानही केल्याने त्यावरून राजकारण तापले आहे.

गुलाबचंद कटारिया म्हणाले, “भविष्याची घंटा वाजत आहे, वेळीच सावध व्हा. अन्यथा, आपल्या मुलांना इतरांच्या भरवशावर सोडून जावं लागेल. संघामुळेच काही प्रमाणात हिंदू जिवंत आहे. नाहीतर पूर्वी कोणीतरी ‘अभिमानाने सांग मी हिंदू आहे’ असे म्हणायचं, तेव्हा नेहरूजी म्हणायचे मला गाढव म्हणा पण मला हिंदू म्हणू नका.”

गुलाबचंद कटारिया पुढे म्हणाले, “ज्या दिवशी मंदिर पाडण्याची ही घटना घडली, त्यादिवशी इथे लोकांनी एकत्र जमायला हवं होतं. परंतु तसं काहीच झालं नाही. वेळीच जागरुक न झाल्यास येणाऱ्या काळात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. भाजपा नेते कटारिया कोणत्याही समाजाचे नाव न घेता म्हणाले की, जेव्हा जेव्हा ‘त्या’ लोकांची लोकसंख्या वाढते तेव्हा लोकांना मंदिर सोडून पळावे लागले आहे.”

भाजपा नेत्याने राज्यातील अशोक गेहलोत सरकारवरही जोरदार निशाणा साधला. शिवमंदिर तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी कटारिया यांनी केली, तसेच मंदिराच्या पुनर्बांधणीची मागणीही केली. याशिवाय गुलाबचंद कटारिया यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “चित्तौडगढ जिल्ह्यातील डुंगला उपविभागातील करसाना ग्रामपंचायत क्षेत्रातील मंदिर प्रशासनाने नुकतेच पाडले. मंदिर पाडणे हा श्रद्धेचा भंग आहे. आम्हाला पराभव मान्य आहे, पण मंदिर पाडणे नाही.”

२ फेब्रुवारी रोजी प्रशासनाने अतिक्रमण हटवण्यासाठी शिवमंदिर पाडून प्रस्तावित जागा रिको इंडस्ट्रीयल एरियाला दिली होती, त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या