राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेश बदलाची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र आता हाफ पँटची जागा फुलपँटने घेतली असून, याबाबत आज निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
यापुढे स्वयंसेवक खाकी हाफ पँटच्या जागी फुलपँन्ट परिधान करतील, अशी माहिती संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी दिली. राजस्थानच्या प्रतिनिधी सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या गणवेशानुसार शाखेत खाकी हाफ पँट कायम असेल. मात्र संघाचे कार्यक्रम किंवा मदतकार्याला जाताना राखाडी रंगाची पूर्ण पँट असा नवा गणवेश असेल. परदेशात हिंदू स्वयंसेवक संघाचा हा गणवेश आहे. संघाच्या गणवेशात बदल व्हावा अशी मागणी सातत्याने पुढे येत होती.
१९२० साली नागपुरात काँग्रेसचे अधिवेशन झाले. या अधिवेशनाच्या व्यवस्थेसाठी स्वयंसेवकांची जबाबदारी संघ संस्थापक डॉ. के.ब. हेडगेवार व डॉ. ल.वा. परांजपे यांच्यावर सोपवण्यात आली होती. या दोघांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेल्या भारत स्वयंसेवक संघाचा गणवेशच संघाने सुरुवातीला स्वीकारला. अगदी सुरुवातीला खाकी फुलपँट, खाकी शर्ट, लाँग बूट, खाकी पटिस (पट्टय़ा), पुंगळी, लाल पट्टा, काळी टोपी व दंड, असा गणवेश होता. १९४० साली पहिल्यांदा झालेल्या बदलात पँट व शर्ट हे दोन्ही बदलून खाकी हाफपँट, पांढरा सुती शर्ट, लाँग बूट, खाकी पटिस, पुंगळी, ब्राऊन रंगाचा चामडी पट्टा, काळी टोपी व दंड हा गणवेश झाला. १९७७ साली दुसऱ्यांदा झालेला बदल फक्त बुटांचा होता. त्यानंतर आतापर्यंत खाकी हाफपँट, पांढरा शर्ट (सुती किंवा टेरिकॉट), साधे काळे बूट, खाकी मोजे, ब्राऊन चामडी पट्टा, काळी टोपी व दंड, असा संघ स्वयंसेवकांचा गणवेश आहे. त्यानंतर तिसऱ्यांदा झालेला बदल हाफपँटवर घालण्याच्या पट्टय़ापुरता (बेल्ट) मर्यादित होता.