scorecardresearch

अल्पवयीन मुलांकडून गुन्हा, मालक-पालक दोषी ; देशात नवी वाहतूकदंड आकारणी

वाहतूक नियमांचा भंग केल्यास आकारला जाणारा दंड आता भरघोस वाढवण्यात आला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

वाहतूक नियमांचा भंग केल्यास वाहनधारकांना १ सप्टेंबरपासून अधिक दंड भरावा लागणार आहे. वाढते रस्ते अपघात रोखण्याचा उपाय म्हणून दंडाच्या रकमेत ही वाढ झाली आहे. नव्या मोटार वाहतूक कायद्यातील ६३ तरतुदी लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना काढली आहे. अर्थसंकल्पी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सदनात मोटार वाहतूक दुरुस्ती विधेयक संमत करण्यात आले होते.

वाहतूक नियमांचा भंग केल्यास आकारला जाणारा दंड आता भरघोस वाढवण्यात आला आहे. यात कमीत कमी म्हणजे ५०० रुपये दंड हा रस्ते नियम तोडण्यासाठी असून जास्तीत जास्त म्हणजे २५ हजार रुपये दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास हा अल्पवयीन मुला-मुलीने वाहन चालवून गुन्हा केल्यास मालक वा पालकाला भोगावा लागणार आहे.

परवाना नसताना वाहन चालवल्यास होणारा दंड ५०० रुपयांवरून ५ हजार रुपये केला गेला आहे. मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालवल्यास आता ४०० रुपयांऐवजी २ हजार रुपये दंड आकारला जाईल. कायमस्वरूपी चालक परवाना मिळवण्याची प्रक्रियाही अधिक कडक करण्यात आली आहे. रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून न दिल्यास दहा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
रस्ते अपघातात दरवर्षी दीड लाख लोकांना प्राण गमवावे लागतात. अपघातांमध्ये दगावणाऱ्यांत तरुणांची संख्या सर्वाधिक असून हे प्रमाण एकूण अपघात मृत्यूंच्या ६५ टक्के आहे. हे लक्षात घेत वाहनधारकांवर वचक बसवण्यासाठी नियम अधिक कडक करून वाहतुकीला शिस्त लावणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे, यासाठी नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक खात्याने जुन्या कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक गेल्या लोकसभेतच मांडले होते. त्याला १७व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात मंजुरी मिळाली.

वाहतूक नियम अधिक कठोर –

* रस्ते नियमांचा भंग – जुना दंड १०० रु., नवीन दंड ५०० रु

* प्रशासनाचा आदेशभंग- जुना दंड ५०० रु, नवीन दंड २,००० रु.

* परवाना नसलेले वाहन चालवणे – जुना दंड – ५०० नवीन दंड- ५,००० रु.

* पात्र नसताना वाहन चालवणे- जुना दंड ५०० रु, नवीन दंड १०,००० रु

* वेगमर्यादा तोडणे   – जुना दंड – ४०० रु, नवीन दंड – २,००० रु

* धोकादायक वाहन चालवणे, जुना दंड – १,०००, नवीन दंड ५,००० रु

* दारू पिऊन वाहन चालवणे – जुना दंड २,००० रु, नवीन दंड – १०,००० रु.

* वेगवान वाहन चालवणे- जुना दंड – ५०० रु, नवीन दंड – ५,००० रु

* विनापरवाना वाहन चालवणे – जुना दंड, ५,००० रु., नवीन दंड – १०,०००

* सीटबेल्ट नसणे – जुना दंड- १०० रु, नवीन दंड – १,००० रु

* दुचाकीवर दोनपेक्षा जास्त व्यक्ती – जुना दंड -१०० रु, नवीन दंड – २,००० रु

* अ‍ॅम्ब्युलन्ससारख्या महत्त्वाच्या वाहनांना रस्ता न देणे – नवीन दंड – १०,०००

* विमा नसताना वाहन चालवणे – जुना दंड १,००० रु, नवीन दंड – २, ००० रु

* अल्पवयीन मुला-मुलींकडून गुन्हा — २५,००० रु. दंड व मालक – पालक दोषी. ३ वर्षे तुरुंगवास.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: New traffic violation rules implementation from 1st september sas

ताज्या बातम्या