दक्षिण आफ्रिका आणि अन्य काही देशांमध्ये करोना विषाणूचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. हा विषाणू वेगाने पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. लसीकरणानंतरही या व्हेरिएंटचा धोका असल्याचं सांगण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकबल डिजीस (एनआयसीडी) आणि क्वाझुलु नेटाल रिसर्च इनोव्हेशन अँड सिक्वेन्सिंग प्लॅटफॉर्मच्या शास्त्रज्ञांना पहिल्यांदा या विषाणूची माहिती मिळाली होती. या विषाणूच्या व्हेरिएंटला C.१.२ असं नाव देण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेत नव्या व्हेरिएंटने प्रभावित लोकांची संख्या वाढत आहे. मे महिन्यात हे प्रमाण ०.२ टक्के होते. ते प्रमाण जूनमध्ये १.६ टक्के आणि जुलै महिन्यात २ टक्के झालं आहे.

करोनाचा नवा व्हेरिएंट C.१.२ हा चीन, कांगो, मॉरिशस, इंग्लंड, न्यूझीलंड, पोर्तुगाल, स्वित्झर्लंडमध्ये १३ ऑगस्टपर्यंत आढळून आला आहे. २४ ऑगस्टला प्रीप्रिंट रिपोजिटरी MediRxiv वर एक अहवाल जारी करण्यात आला होता. त्यात C.१.२ हा व्हेरिएंट C.२ च्या तुलनेत अधिक घातक असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे नव्या व्हेरिएंटबाबत चिंता वाढली आहे.

C.१ च्या तुलनेत नवा व्हेरिएंट म्यूटेट आहे. वुहानमध्ये आढळून आलेल्या व्हायरसपेक्षा अधिक म्यूटेट असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे. C.१.२ मध्ये आढळून आलेले जवळपास ५२ टक्के स्पाइक म्यूटेशन यापूर्वी VOI आणि VOCsमध्ये दिसून आलेत. यात D614G सर्व व्हेरिएंटसाठी सामान्य आणि E484k आणि N501Yचा समावेश आहे.

दिलासादायक: एप्रिलच्या तुलनेत लसीचं उत्पादन दुप्पट; लवकरच निर्यातही होण्याची शक्यता

दुसरीकडे, देशात गेल्या अनेक दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या ४० हजारांपेक्षा कमी होती. मात्र, २६ ऑगस्टपासून करोनाबाधितांची संख्या सातत्याने ४० हजारांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे करोना कमी होतोय ही भावना मनात ठेवून निष्काळजीपणा न करता खबरदारी घेणं गरजेचं झालंय. २६ ऑगस्ट रोजी बुधवारी देशात आधीच्या रुग्णसंख्येत तब्बल २३ टक्क्यांची वाढ होऊन ४६ हजार १६४ करोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती तसेच ६०७ जणांचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेने देशातील आजची रुग्णसंख्या थोडी कमी आहे. देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ४२ हजार ९०९ रुग्ण आढळले आहेत. तर ३८० जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या ३ लाख ७६ हजार ३२४ रुग्ण उपचाराधीन आहेत. रविवारी दिवसभरात ३४ हजार ७६३ जण करोनातून बरे झाले असून देशाचा रिकव्हरी रेट सध्या ९७.५१ टक्क्यांवर आहे. आतापर्यंत करोनातून ३ कोटी १९ लाख २३ हजार ४०५ रुग्ण बरे झाले आहेत.