निपाह व्हायरस पसरण्यामागे कारणीभूत रामबुतान फळ काय आहे? जाणून घ्या

केरळमध्ये जेवढ्या लोकांना निपाहची लागण झाली त्या सर्वांनीच हे फळ खाल्लं असल्याची माहिती समोर आली आहे.

(Photo credit – Pixabay and Indian Express)

केरळमध्ये करोनाचा प्रादुर्भाव कायम असताना आता निपाह व्हायरसचे रुग्ण आढळू लागल्याने चिंतेचं वातावरण आहे. एका मुलाच्या मृत्यूनंतर निपाह व्हायरस पुन्हा चर्चेत आला असून त्यासोबतच एका फळाची चर्चा सगळीकडे होऊ लागली आहे. निपाह व्हायरस पसरण्याचा या फळाशी संबंध असू शकतो, असं म्हटलं जातंय. जेवढ्या लोकांना निपाहची लागण झाली त्या सर्वांनीच हे फळ खाल्लं असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ज्या मुलाचा मृत्यू झाला त्यानेदेखील हे फळ खाल्लं होतं, असं समजतंय. त्यामुळे हे फळ तपासणीसाठी इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी पुणे येथे पाठवण्यात आले आहे. या फळाचं नाव आहे, रामबुतान फळ.

या फळावर लाल रंगाच्या केसासारखे कवच असते. त्याच्या आत लीचीसारखे गोड आणि चटपटीत फळ असते. या फळाच्या झाडावर वटवाघुळ घरटे बनवतात, असं म्हटलं जातं. हे फळ प्रामुख्याने दक्षिण आशियाई देशांमध्ये आढळतं आणि लिचीसारखं दिसतं. या फळाचे फायदे आणि तोटे दोन्ही असले तरी हे फळ एखादा वायरस पसरवू शकतो, असं मानलं गेलं नव्हतं. दरम्यान, हे फळ वटवाघुळाने उष्ट केलं असेल तर त्यातून विषाणुचा प्रसार होऊ शकतो. आज आपण या फळाबाबत जाणून घेणार आहोत. याबाबत न्यूज १८ ने वृत्त दिलंय.

या फळातील औषधी गुणधर्म..

या फळात प्रोटीन, फायबर, कॅल्शिअम, आयर्न, फॉस्फरस, जस्त, तांबे, मॅंगनीज, राइबोफ्लेविन, नियासिन यासारखे पोषक घटक आढळतात. फायटोकेमिकल्स नावाची संयुगे आढळतात. ती अँटीडायबेटिक, अँटी-एलर्जीक आणि अँटीमाइक्रोबियल मानली जातात. जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करते.

शरीरातील ऊर्जा वाढवते..

या फळामुळे शरीरातील ऊर्जा वाढते तसेच ताजेतवाने वाटते. यामध्ये भरपूर कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट असतात. तसेच व्हिटॅमिन सी आणि ए देखील भरपूर प्रमाणात आढळते. आणि ते शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. रामबुतान फळाचे सेवन केल्याने पाचनक्रिया चांगली राहते. तसेच गॅस आणि अपचनाचा त्रास कमी होण्यास मदत होते. हे फळ आरोग्यासह सौंदर्यासाठी देखील उपयुक्त आहे. यामुळे केसांमध्ये मजबुती आणि चमक येते. शिवाय केसांच्या वाढीसाठीदेखील फायदेशीर आहे.

रामबुतान फळाचे नुकसान..

-यामध्ये पोटॅशियम असल्याने, जास्त सेवन केल्यास उलट्या आणि अतिसार होऊ शकतो.

-त्याच्या सालीतून काढलेल्या अर्कांचा जास्त वापर केल्याने शरीरात विषारी पातळी वाढू शकते.

-जर एखाद्याला नवीन खाद्यपदार्थांची एलर्जी असेल तर या फळामुळे देखील एलर्जी होऊ शकते.

वटवाघुळ आणि रामबुतान फळातील संबंध काय?

साधारणपणे ज्या ठिकाणी रामबुतान फळाची झाडं असतात, तिथे वटवाघुळ जास्त आढळतात. ते याच झाडांवर राहतात आणि फळांवर देखील बसतात. वटवाघळांमध्ये अनेक प्रकारचे विषाणू असल्याने ते या फळांच्या संपर्कात आल्यामुळे संक्रमित होतात.

लीची आणि रामबुतान फळांमधील फरक..

लीची हे रामबुतान पेक्षा आकाराने थोडे लहान आहे. दोन्ही लाल रंगाचे असले तरी लीची थोडी कडक असते. लीचीचा गर देखील पांढराच असतो. मात्र दोन्हीची चव वेगळी असते. लीचीमध्ये एक मोठे बी असते. लीचीची साल जास्त जाड नसते आणि ती सोलून काढता येते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nipah outbreak in kerala know about rambutan fruit hrc

ताज्या बातम्या