Nitin Gadkari Promise to Make Roads of bihar Like America : बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दलासह अनेक पक्ष बिहार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीसाठी स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवरील नेते जोरदार प्रचार करत आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी देखील बिहारमध्ये भाजपा उमेदवारांचा प्रचार करत आहेत. अनेक ठिकाणी ते बिहारच्या जनतेला चांगले रस्ते देण्याचं, राष्ट्रीय महामार्ग जागतिक दर्जाचे बनवून देण्याचं आश्वासन देत आहेत. मात्र, त्यांनी बिहारच्या जनतेला अशी आश्वासनं यापूर्वी देखील दिली आहेत.

निवडणूक प्रचारादरम्यान नितीन गडकरी हे त्यांच्याच जुन्या भाषणांची पुनरावृत्ती करत असल्याचं पाहून नेटकऱ्यांनी त्यांना समाजमाध्यमांवर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी गडकरी यांची जुनी व नवी भाषणं एकत्र करून समाजमाध्यमांवर शेअर केली आहेत.

७ जून २०२२ रोजी बिहारमधील हाजीपूर येथे नितीन गडकरी यांच्या हस्ते १३,५८५ कोटी रुपयांचे १५ रस्ते व काही पूल प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात आलं होतं. यामध्ये महात्मा गांधी सेतूचाही समावेश होता. यावेळी गडकरी म्हणाले होते की “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही देशातील पायाभूत सुविधा बदलण्याचा संकल्प केला आहे.”

२०२४ अखेरपर्यंत बिहारमधील रस्ते अमेरिकेसारखे होतील : गडकरी

नितीन गडकरी २०२२ च्या त्या कार्यक्रमात म्हणाले, “मी तुम्हा सर्वांना आश्वासन देतो की २०२४ च्या अखेरपर्यंत बिहारमधील रस्त्यांचं जाळं अमेरिकेइतकं चांगल्या दर्जाचं असेल. मी तुम्हा सर्वांना वचन देतो. मी जेव्हा अशी आश्वासनं देतो तेव्हा पत्रकारांना सांगतो की तुमच्या डायरीत ही गोष्ट नमूद करून ठेवा. कारण मी कधीच खोटी आश्वासनं देत नाही. मी जे बोलतो ते करून दाखवतो. जे जे बोलणार ते करून दाखवण्याचं वचन देतो.”

२०२५ मध्ये जुन्याच भाषणाचं पुनरावृत्ती

नितीन गडकरी यांनी सोमवारी (४ नोव्हेंबर २०२५) जलालपूरमधील मांझी विधानसभा मतदारसंघातील संयुक्त जनता दलाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित सभेला संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले, “मी बिहारच्या जनतेला वचन देतो की बिहारमधील राष्ट्रीय महामार्ग मी जागतिक दर्जाचे बनवून देईन. तो दिवस आता दूर नाही जेव्हा तुम्हाला बिहारमधील रस्ते अमेरिकेसारखे वाटतील. मी तुमच्या बिहारमधील रस्ते अमेरिकेसारखे बांधून देणार आहे. हे माझं तुम्हा सर्वांना वचन आहे. मी बिहारमध्ये एकापेक्षा एक असे पूल देखील बांधणार आहे.”