भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, नजमा हेपतुल्ला यांच्याबरोबर खासदार हेमा मालिनी यांना वगळण्यात आले आहे, तर केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू व वीरेंद्र सिंह यांचा समावेश करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी यांच्यासह बहुतेक ज्येष्ठ नेत्यांना कायम ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीत व्ही. के. सिंह, सुब्रमण्यम स्वामी यांचाही समावेश करण्यात आला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात बंगळुरूमध्ये नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्यता आहे. गीतकार व केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो व खासदार किरण खेर यांचा विशेष निमंत्रित म्हणून समावेश करण्यात आला आहे. १११ सदस्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत बहुसंख्य केंद्रीय मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह २७ जणांचा कायम निमंत्रित म्हणून समावेश करण्यात आला आहे, तर ४० विशेष निमंत्रित आहेत.भाजपचे सर्व आठ मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री याखेरीज २४ माजी मुख्यमंत्री व तीन माजी उपमुख्यमंत्र्यांना कायम निमंत्रित म्हणून स्थान मिळाले आहे. जसवंत सिंह व त्यांचे पुत्र मानवेंद्र यांना, तसेच राज्यपालपदी नियुक्त केलेल्या नेत्यांना अपेक्षेप्रमाणे वगळण्यात आले आहे.