Which Indians get Nobel Peace Prize: यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे नेहमीपेक्षा अधिक चर्चेत राहिला. २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी गेले काही महिने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रयत्नशील होते. तशी इच्छा त्यांनी अनेकदा जाहीर केली होती. मात्र नोबेल समितीने त्यांच्या जागतिक दबावाला बळी न पडता मचाडो यांना पुरस्कार दिला. यानिमित्ताने आता नोबेल शांतता पुरस्काराचे महत्त्व, त्याचे निकष याची चर्चा होत आहे. त्याचबरोबर भारतातील किती जणांना शांततेसाठी पुरस्कार मिळाला? याचीही चर्चा होत आहे.

यावर्षीच्या प्रतिष्ठित नोबेल शांतता पुरस्कारासाठी ३३८ नामांकने प्राप्त झाली होती. ज्यामध्ये २२४ व्यक्ती आणि ९४ संस्थांचा समावेश होता. १९०१ साली पुरस्कार देण्यास सुरुवात झाल्यापासून आजवर जवळपास १०५ वेळा नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला आहे. एकूण १४२ विजेत्यांचा यात समावेस आहे. यापैकी १११ व्यक्ती आहेत. तर ३१ संस्थांना शांतता पुरस्कार मिळाला आहे. १११ पैकी ९२ पुरूष तर १९ महिला आहेत.

मानवतेसाठी शाश्वत आणि अपवादात्मक योगदान देणाऱ्यांना नोबेल शांतता पुरस्काराने गौरविण्यात येते. या पुरस्काराला जगभरात मोठी प्रतिष्ठा आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखे मातब्बर नेतेही सदर पुरस्कारासाठी आग्रही होते.

भारतातील किती जणांना मिळाला आहे शांततेसाठी पुरस्कार?

भारतातील दोघाजणांना आतापर्यंत नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त झाला आहे.

मदर तेरेसा

१९७९ साली मदर तेरेसा यांना हा पुरस्कार मिळाला. मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेद्वारे गरीब, आजारी आणि निराधार लोकांची सेवा केल्याबद्दल आणि यासाठी आयुष्यभर समर्पित राहिल्याबद्दल या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. मदर तेरेसा यांना भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. १९९७ साली वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

कैलाश सत्यार्थी

२०१४ साली कैलाश सत्यार्थी यांनाही नोबेल शांतता पुरस्काराने गौरविण्यात आले होते. बालमजुरीविरुद्ध त्यांनी दिलेल्या अथक लढ्यासाठी आणि लहान मुलांच्या शिक्षणाचा अधिकार सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. बाल कामगार असलेल्या हजारो मुलांना त्यांनी शोषणापासून वाचवले होते.

दलाई लामा

भारतात निर्वासित जीवन जगणारे आणि मुळचे तिबेटचे नागरिक असलेल्या दलाई लामा यांना १९८९ साली नोबेल शांतता पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

महात्मा गांधी

नोबेल शांतता पुरस्कारासाठी महात्मा गांधी यांचे अनेकदा नामांकन झाले असल्याचे काही माध्यमांचे म्हणणे आहे. मात्र त्यांना हा पुरस्कार कधीही मिळाला नाही. यंदा पुरस्कार मिळविणाऱ्या मारिया कोरिना मचाडो यांनीही महात्मा गांधी यांच्या कार्याचा उल्लेख केला होता.

Nobel Peace Prize winner 2025 Maria Corina Machado Mahatma Gandhi Influence
नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मारिया कोरिना मचाडो यांच्यावरही महात्मा गांधींचा प्रभाव. (Photo: PTI And @MariaCorinaYA/X)

बक्षिसाची रक्कम किती?

नोबेल शांतता पुरस्काराच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, पुरस्कार प्राप्त व्यक्तीला बक्षीस म्हणून १.१ कोटी स्वीडिश क्रोनर (SEK) एवढी रक्कम दिली जाते. पुरस्काराच्या स्वरूपात विजेत्यांना सुवर्णपदक, वैयक्तिक सन्मानपत्रही देण्यात येते. (भारतीय चलनानुसार बक्षिसाची रक्कम सुमारे नऊ कोटी रुपयांहून अधिक होते.)

भारतातील इतर नोबेल विजेते कोण?

  • रवींद्रनाथ टागोर यांना १९१३ साली साहित्यासाठी नोबेल पारितोषिक मिळाले.
  • डॉक्टर चंद्रशेखर व्यंकट रामण यांना १९३० साली भौतिकशास्त्रासाठी
  • हरगोविंद खोराना यांना १९६८ साली वैद्यकशास्त्रासाठी
  • मदर तेरेसा, १९७९ (शांतता)
  • सुब्रह्मण्यन चंद्रशेखर यांना १९८३ साली भौतिकशास्त्रासाठी
  • अमर्त्य सेन यांना १९९८ साली अर्थशास्त्रासाठी
  • वेंकटरामन रामकृष्णन यांना २००९ साली रसायनशास्त्रातील कामगिरीसाठी
  • कैलाश सत्यार्थी, २०१४ (शांतता)
  • अभिजीत बॅनर्जी यांना २०१९ साली अर्थशास्त्रासाठी विभागून नोबेल देण्यात आले.