अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्याने पूर्णपणे माघार घेतल्यानंतर तालिबान आता देशात सरकार स्थापनासंदर्भात हलचाली करत असतानाच दुसरीकडे तालिबानविरोधात लढणाऱ्या नॉर्दन अलायन्स आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांच्या फौजांना मिळणारा पाठिंबा वाढताना दिसतोय. आधी जशीर आणि कापीसामध्ये तालिबान्यांविरोधातील लढ्यात स्थानिकांकडून पाठिंबा मिळल्यानंतर आता अहमद मसूदच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या नॉर्दन अलायन्सला थेट परदेशातून पाठिंबा मिळताना दिसत आहे. मंगळवारी फ्रान्सची राजधानी असणाऱ्या पॅऱिसमधील आयफेल टॉवर येथे नॉर्दन अलायन्सच्या समर्थकांनी अफगाणिस्तानचे झेंडे घेऊन समर्थनार्थ गर्दी केल्याचं पहायला मिळालं. सोमवारी अमेरिकन सैन्याची शेवटची तुकडी अफगाणिस्तानमधून मायदेशी परतल्यानंतरही आमचा संघर्ष सुरुच राहील असं सालेह आणि नॉर्दन अलायन्सने स्पष्ट केलं आहे.

नक्की वाचा >> “कदाचित माझ्या मुलाच्या ‘त्या’ इच्छेसाठी मी सैन्य माघारी घेण्याचा निर्णय घेतला असावा”; बायडेन यांचं भावनिक वक्तव्य

अमेरिकेने देश सोडताच तालिबान्यांनी पंजशीरवर हल्ला केला आहे. मात्र या हल्ल्यात तालिबानला मोठे नुकसान झाले. तालिबानला नॉर्दन अलायन्स आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांच्या फौजांकडून सडेतोड उत्तर मिळाले आहे. या संघर्षामध्ये ८ तालिबानी ठार झाले आहेत. एकीकडे ही लढाई सुरु असतानाच आता नॉर्दन अलायन्सला जगभरामधून हळूहळू पाठिंबा मिळण्यास सुरुवात होत आहे. याची झलक पॅरिसमध्ये पहायला मिळाली. येथे नॉर्दन अलायन्सला पाठिंबा देण्यासाठी शेकडो लोकं हिरवा, पांढरा आणि काळ्या रंगाचा झेंडा आणि अफगाणिस्तानचा राष्ट्रध्वज येऊन आले होते. त्यांनी नॉर्दन अलायन्सला पाठिंबा असल्याची घोषणाबाजीही केल्याचं सांगण्यात येतं. हे फोटो आता सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेत.

नक्की वाचा >> तालिबानचं अभिनंदन करताना ‘अल-कायदा’ने केला काश्मीरचा उल्लेख; म्हटलं, “इतर इस्लामिक प्रदेशही…”

या फोटोंमध्ये नॉर्दन असलायन्सचे समर्थक मोठ्याप्रमाणात दिसत आहेत.

अमेरिकेने अफगाणिस्तान सोडल्यानंतरही संघर्ष सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत सालेह यांनी ३१ ऑगस्ट रोजीच दिले आहेत. अमेरिकेने घेतलेली माघार या संदर्भात सालेह यांना प्रश्न विचारण्यात आला असता यांनी, “अफगाणिस्तान ते काही शेवटच्या सैनिकाच्या बॅगमध्ये पॅक करुन घेऊन गेलेले नाहीत. देश इथेच आहे. नद्या अजून वाहतायत, डोंगर अजूनही भक्कपणे उभे आहेत. तालिबानी येथील लोकांना आवडत नाहीत आणि त्यांच्याविरोधात येथे द्वेष आहे. म्हणूनच संपूर्ण देशातील लोकांना सध्या देशाबाहेर पडायचं आहे. सुपर पॉवर म्हणवणाऱ्या अमेरिकने ते मिनी पॉवर असल्याचं दाखवून दिलं, पण हरकत नाही,” अशा शब्दांमध्ये अमेरिकेला टोला लगावला.

नक्की वाचा >> “…म्हणून अफगाणिस्तान सोडण्याशिवाय काही पर्याय नव्हता”; सैन्य माघार घेण्याचं कारण सांगताना बायडेन यांनी केला चीन, रशियाचा उल्लेख

यापूर्वीच्या मुलाखतीमध्ये सालेह यांना अमेरिका अफगाणिस्तान सोडून जाईल यासंदर्भात विचारण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी, “अमेरिकेने उद्या देश सोडायचं ठरवलं तर आमचा त्या निर्णय़ावर काहीच प्रभाव पडणार नाही. आम्ही फक्त त्यांना आमची कथा सांगू शकतो. त्यांना आपलं संयुक्त ध्येय काय होतं याची आठवण करुन देऊ शकतो. आपला एकच शत्रू कोण आहे हे पुन्हा सांगू शकतो पण त्यांनी जायचं ठरवलं तर तो त्यांचा निर्णय असेल,” असं म्हटलं होतं.

नक्की वाचा >> “…तर किमान बॉम्ब तरी टाका”; अफगाणिस्तानसंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांची बायडेन प्रशासनाकडे मागणी

कोण आहेत सालेह?

४८ वर्षीय अमरुल्लाह सालेह हे एक माजी गुप्तहेर आहेत. सालेह यांनी अशरफ घनी यांच्याप्रमाणे देश सोडलेला नसून सध्या ते अफगाणिस्तानच्या पंजशीर खोऱ्यात असल्याचं सांगितलं जात आहे. या भागामध्ये अजूनही तालिबान्यांचा पूर्णपणे अंमल प्रस्थापित झालेला नाही. तालिबान्यांविरोधात अफगाणी ताकद गोळा करण्याचा सालेह प्रयत्न करत आहेत. अहमद मसूद आणि माजी संरक्षण मंत्री बिस्मिल्लाह मोहम्मदी यांनी देखील मदतीचं आश्वासन दिलं आहे.

नक्की वाचा >> पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीचं तालिबानला खुलं समर्थन, म्हणाला, “ते जबरदस्त…”

अहमद मसूद हे अफगाणी कमांडर अहमद शाह मसूद यांचे पुत्र आहेत. १९९६ ते २००१ या कालावधीमध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांची सत्ता होती. मात्र, या काळात देखील तालिबान्यांना अहमद शाह मसूद यांच्यामुळे पंजशीर खोऱ्यावर अंमल प्रस्थापित करता आला नव्हता.